आठवलेंवर असणार भिस्त...!

आठवलेंवर असणार भिस्त...!

रिपब्लिकन पार्टी - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) भाजपसोबत असणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत स्टार प्रचारक हे पक्षाचे निरीक्षक राजाभाऊ सरवदे असणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सोलापुरात प्रचारासाठी आणण्याचे प्रयत्न असणार आहेत. प्रचाराची धुरा राजाभाऊ सरवदे यांच्यावर असून राज्य व पश्‍चिम महाराष्ट्र कार्यकारिणी त्यांच्यासोबत असणार आहे. महापालिका वर्षभराचा कर सामान्य सोलापूरकरांकडून घेते, मात्र त्या प्रमाणात सुविधा देण्यात येत नाहीत. स्मार्ट सिटीची घोषणा होऊन इतके वर्ष झाले, मात्र कामाची अंमलबजावणी अजून नाही. अधिकारी नेमण्यास सहा महिने लागतात. या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन पक्षातर्फे देण्यात आले आहे.

स्टार मुद्दे...
पाण्याचे योग्य नियोजन
कचऱ्याचे व्यवस्थापन
स्मार्ट सिटीच्या कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार
झोपडपट्टीच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य
 

ओवेसी बंधूंकडून होणार धमाका

एमआयएम  - महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा बार ‘एमआयएम’कडून उडणार आहे. आणखीन एकाही पक्षाच्या स्टार प्रचारकाची सभा सोलापुरात झाली नाही. मात्र, ‘एमआयएम’चे नेते आमदार अकबरोद्दीन ओवेसी यांची सभा मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी होटगी रस्त्यावरील लोकमान्यनगर येथे होणार आहे. 

निवडणुकीच्या हालचालींना सर्वांत शेवटी सुरवात होऊनही पहिली सभा घेण्याचा मान ‘एमआयएम’ पक्षाने पटकाविला असे म्हणता येईल. या सभेतील मुद्‌द्यां‌वर इतर पक्षाचे नेते बोलून झालेल्या टीकेचे खंडन करण्याचा प्रयत्न होणार आहे. खासदार असुदोद्दीन ओवेसी यांचीही सभा घेण्याचे नियोजन चालू आहे. मात्र, त्यांना वेळ नसल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहरातील पदाधिकारी त्यांची सभा होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याशिवाय औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील, तेलंगणाचे आमदार मो. अहमद खान, भायखळाचे आमदार वारीस पठाण, तसेच हैदराबादचे तीन आमदार आणि पक्ष निरीक्षक खाजा बिलाल यांच्यावर स्टार प्रचारकाची भिस्त असणार आहे. 

स्टार मुद्दे...
मुस्लिम, दलित वस्त्यांचा विकास झाला नाही. ५० वर्षे सत्ता उपभोगून दलित, मुस्लिम भागाकडे दुर्लक्ष केले. ‘एमआयएम’ महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरून दलित, मुस्लिम भागाचा विकास करण्यावर भर देणार.

तब्बल ४० स्टार प्रचारक...!

मनसे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापालिकेची तिसरी निवडणूक लढविली जात आहे. कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवीत असून जवळपास त्यांनी सर्वच ठिकाणी उमेदवारांची निश्‍चित केली आहे. तीन टप्प्यांत अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्धी होणार आहे. 
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्या हस्ते फुटणार आहे. त्यानंतर मनसेच्या निवडणुकीला चांगलाच रंग भरणार आहे. त्यात शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय चित्रे, अविनाश अभ्यंकर, दीपक पायगुडे, अनिल शिदोरे, जयप्रकाश बावीस्कर, मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, मंगेश सांगळे, परशुराम उपरकर, बाबाराजे जाधवराव (जिल्हा संपर्काध्यक्ष), प्रमोद पाटील, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, संदीप देशपांडे, नारायण खोपकर, संजय जामदार, संजय नाईक, उदय सामंत असे तगडे ४० स्टार प्रचारक उतरणार आहेत. 

स्टार मुद्दे...
शहरातील नागरी सुविधेचा अभाव, नाशिक शहराच्या धर्तीवर इतर ठिकाणचा विकास करणे. एकदा संधी देऊन नाशिकसारखा कायापालट करण्याची संधी द्या.

गरुड, उपासक यांच्यावर धुरा

बहुजन समाज पक्ष - बहुजन समाज पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड व महाराष्ट्र प्रभारी गौरीप्रसाद उपासक हे स्टार प्रचारक असणार आहेत. सोलापूर शहराला खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी बनविणे हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे. विद्यमान नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या प्रभागाची आदर्श प्रभाग म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अशाच प्रकारचा ॲक्‍शन प्लॅन इतर प्रभागांत राबविण्याचा ‘बसप’चा मानस आहे. शहरात पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई आहे. योग्य नियोजन केल्यास ही टंचाई दूर करता येऊ शकते.  शहरात दूषित पाणी पिऊन मृत्युमुखी पडलेल्याचे उदाहरण आहे. अशा घटना शहरासाठी अत्यंत दुर्दैवी आहेत. अशा चुका पुन्हा होऊ नये, यासाठी बसप प्रयत्नशील असणार आहे.

स्टार मुद्दे...
सोशल इंजिनिअरिंग
आदर्श प्रभाग करण्याचा संकल्प
पाण्याची समस्या दूर करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com