मास्टर स्ट्रोक शिंदेंचा; खेळी विधानसभेची

solapur
solapur

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह दक्षिणमधील नेत्यांवर सोपवून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "मास्टर स्ट्रोक' मारला आहे. ही जबाबदारी सोपविण्यामागे भविष्यातील बदलाची नांदी ठरणारे "डावपेच' असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीत शहर उत्तर विधानसभेची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह माजी आमदार दिलीप माने व राजशेखर शिवदारे यांच्यावर सोपवण्यात आल्याची घोषणा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आणि या मतदारसंघातील प्रस्थापित नेत्यांच्या भुवया उंचावल्या. शिंदे यांनी अनपेक्षितपणे मारलेल्या या "मास्टर स्ट्रोक'मुळे अनेकांना धक्का बसला असला तरी ही खेळी खेळण्यामागे भविष्यातील विधानसभा निवडणुकीतील राजकारण असल्याचे बोलले जात आहे. 

गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला लाखोंचे मताधिक्‍क्‍य मिळाले, इतकेच नव्हे तर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गेलेल्या या मतदारसंघातून कॉंग्रेस हद्दपार झाली का अशी स्थिती निर्माण होती. सद्यस्थितीत या मतदारसंघावर पालकमंत्री विजय देशमुख यांचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व कमी करण्यासाठी म्हेत्रे यांच्यावर जबाबदारी सोपविल्याचे दिसत असले तरी, त्यामागे कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण असल्याची चर्चा सुरू आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री देशमुख, म्हेत्रे आणि माने एकत्रित होते. त्याचा काही फायदा लोकसभेच्या निवडणुकीत घेता येईल का, त्याची ही रंगीत तालीम असल्याचे जाणवत आहे. 

लोकसभा निवडणुकीत ही खेळी यशस्वी झाली की विधानसभा निवडणुकीत हे पुन्हा एकत्रित येतील आणि आपापल्या मतदारसंघात ताकदीने काम करतील. तसेच एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणार नाहीत, तथापि आपापल्या समाजाची मते बाजार समितीतील "मित्रा'ला मिळतील यासाठी प्रयत्न करतील, असे नियोजन आहे. त्यात कितपत यश येते हे भविष्यातील राजकीय घडामोडींच्या उलथापालथीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, श्री शिंदे यांनी मारलेला मास्टर स्ट्रोक शहर उत्तर मतदारसंघातील प्रस्थापितांच्या वर्मी लागला हे निश्‍चित. 

कोण असेल शहर उत्तरचा उमेदवार 
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते, शहराध्यक्ष प्रकाश वाले हे इच्छुक आहेत. प्रदेश प्रतिनिधी राजन कामत यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. या तिघांपैकी एकाचे नाव निश्‍चित होऊ शकते. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक गणेश वानकर यांनी शहर मध्यवर दावा केला आहे. या ठिकाणाहून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे हे इच्छुक आहेत. शहर उत्तरची उमेदवारी मिळेल का याची चाचपणी होऊन शिवसेनेत धक्कादायक घडामोडी होऊ शकतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com