राजघराण्यांचेच ‘राज’

राजघराण्यांचेच ‘राज’

बाळासाहेब पाटील व पाटणकरांना थोपवत सत्तेची सूत्रे रामराजे व शिवेंद्रसिंहराजेंकडेच

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने १५ वर्षांत कधी नव्हे इतकी रस्सीखेच पाहायला मिळाली. कोणी कितीही तणातणी केली, तरी राष्ट्रवादीमध्ये राजघराण्यांचा ‘राज’ चालत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बारामतीच्या ‘खलित्या’त ‘मती’ फलटण व साताऱ्याचीच राहिली. जिल्हा परिषदेला खंबीर चेहरे मिळाले असले, तरी सर्व आमदारांमध्ये ताकद दिसली ती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीच. त्यामुळे पुनश्‍चः जिल्ह्याचे सत्तास्थान दोन्ही राजांकडेच राहिले.

गेल्या पंचवार्षिकमध्ये पहिल्या अडीच वर्षांच्या टर्मला रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर उपाध्यक्ष राहिले. त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी माण तालुक्‍याला धुडकावत माणिकराव सोनवलकरांना संधी दिली गेली. मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी खुले झाले. आपसूकच संजीवराजेंच्या पत्नी शिवांजलीराजे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे माणिकरावांचा राजीनामा घेतला गेला आणि सुभाष नरळे यांच्या रूपाने माणला ‘मान’ मिळाला. नंतर फेरआक्षरण होऊन अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाले. हे योगायोग असले तरी अध्यक्षपद फलटणला राखण्यासाठीच मध्यंतरी माणला अल्पकाळाची संधी देऊन रामराजेंनी राजकारणातील ‘तिरपी’ चाल खेळली. 

अध्यक्षपद खुले असल्याने संजीवराजेंना सर्वाधिक संधी होती, तरीही वसंतराव मानकुमारे, मानसिंगराव जगदाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्यासाठी अनुक्रमे आमदार शिवेंद्रसिंहराजे व आमदार बाळासाहेब पाटील यांनीही जोर लावला. उपाध्यक्षपदासाठी राजेश पवार यांच्या नावाचा आग्रह माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी धरला. मात्र, ‘सत्ता असली की ताकद येते, मग भांडणाला बळ मिळते,’ हे सूत्र आमदारकी नसल्याने पाटणकरांबाबत खरे ठरले. वास्तविक पाटणकरांनी पंचायत समितीची सत्ता एकहाती मिळवली. पुढे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना ताकद गरजेची होती. बाळासाहेब पाटील यांनाही उपाध्यक्षपदामुळे बळ मिळणार होते. त्याचा प्रत्यक्ष फायदा राष्ट्रवादीलाही होणारच होता. मात्र, दोन्ही राजांच्या राजकारणात कोणाचे चालत नाही, हे आजही सिद्ध झाले. 

गेल्या वेळी अध्यक्ष निवडीत आनंदराव शेळके- पाटील यांचा पत्ता कट करत आमदार मकरंद पाटील यांना थोपविण्यात आले होते. आता बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकरांना थोपविले गेले. खासदारकीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे माझ्यासह शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील हे तीन उमेदवार असल्याचे सांगून रामराजेंनीही पुढील धागेदोरेही आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे संजीवराजेंना ‘लाल दिवा’ देऊन खासदारकीची द्वारेही मोकळी केल्याची चर्चा आज घुमू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com