माढा : पोलिंग एजंट निमगावातला नसल्याने फेर मतदानाची मागणी फेटाळली 

voting
voting

सोलापूर : निमगाव टें. (ता. माढा) येथील भाजपच्या पोलिंग एजंटला हाकलून दिल्याने या गावात फेर मतदान घ्यावे अशी मागणी माढ्याचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली होती. भाजपने नियुक्त केलेला पोलिंग एजंट त्या गावातील नसल्याने निंबाळकरांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पोलिंग एजंट हा त्याच बुथमधील असणे आवश्‍यक असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली. 

मंगळवारी (ता. 23) माढा लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाल्यानंतर करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण येथून मतदान यंत्र सोलापुरातील रामवाडी गोदामात आणण्यात आली आहेत. आज दिवसभर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत ही मतदान यंत्र सील करण्यात आली आहेत. 

संपूर्ण ताकद लावा, लोकशाहीचा नमुना दाखवतो 
निमगावात फेरमतदानासाठी आम्हाला कसलीही अडचण नाही. आवश्‍यकता असेल तर फेर मतदानाचे पत्रही देतो. मंगळवारी यंत्रणेवर ताण असल्याने कदाचित निमगावात व्यवस्थित बंदोबस्त लावता आला नसेल. आता शासनाकडे असलेली ताकद व यंत्रणा लावून फेर मतदान घ्या, निमगावात लोकशाही काय आहे हे दाखवून देतो असे आव्हान माढ्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिले आहे. राष्ट्रवादीतर्फे माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदान होईपर्यंत राज्यातील भाजप सरकारने सत्तेचा पुरेपूर गैरवापर केल्याचा आरोपही राष्ट्रवादीचे उमेदवार शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या निवडणुकीत बघून घेण्याची भाषा वापरल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

ज्या गावांमध्ये पूर्वीपासूनच उत्स्फूर्तपणे मतदान होते, त्या गावांमध्येही आवश्‍यकता नसताना या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे या गावांतील मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने झाल्याचा आरोपही त्यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातील नेते कुठेही गेले असले तरीही या मतदारसंघातील जनता राष्ट्रवादी व मित्रपक्षांसोबत असल्याने आम्हाला कसलीही अडचण नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com