तंत्रनिकेतनच्या बचावासाठी ऑनलाइन चळवळ

- शीतलकुमार कांबळे 
रविवार, 22 जानेवारी 2017

शासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ नये यासाठी आम्ही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भेटलो. मात्र याबाबत तावडे यांची नकारात्मक भूमिका आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हा प्रश्‍न असल्याने आम्ही शासकीय तंत्रनिकेतन बंद होऊ देणार नाही.
- प्रणिती शिंदे, आमदार

सोलापूरमधील माजी विद्यार्थी पुढे सरसावले; लोकप्रतिनिधींनीही द्यावे लक्ष
सोलापूर - राज्य सरकारच्या आदेशानुसार सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन टप्प्याटप्प्याने बंद करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. तंत्रनिकेतन बंद करू नये, या मागणीसाठी माजी विद्यार्थी पुढे सरसावले असून, यासाठी ऑनलाइन चळवळ सुरू करण्यात आली आहे. तंत्रनिकेतनमधील 2008 चा विद्यार्थी लक्ष्मीकांत दोरनाल याने यासाठी पुढाकार घेतला आहे.

सोलापूरमधील शासकीय तंत्रनिकेतनमधून शिकलेले अनेक तरुण पुणे-मुंबई येथे राहत आहेत. अशा विद्यार्थ्यांनाही सोबत घेऊन शासकीय तंत्रनिकेतन वाचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी "change.org' या संकेतस्थळाचा आधार घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच उच्च शिक्षण मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांचे सचिव, उच्च व तंत्रशिक्षण संचालनालय यांना उद्देशून ही ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली आहे.

काय आहे या याचिकेत
याचिकेमध्ये सोलापुरात होणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्वागत करण्यात आले असून, शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याच्या निर्णयाबाबत काळजी व्यक्त करण्यात आली आहे. सोलापुरात शेतकरी व कामगारांची मुले शासकीय तंत्रनिकेतनमधून शिक्षण घेतात. सोलापुरात एकच शासकीय तंत्रनिकेतन आहे. ते बंद करून सरकार गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन एकाच वेळी सुरू करता येतात. दोन वेगवेगळ्या पाळांमध्ये दोन्ही महाविद्यालये चालविता येतात. याचा विचार करून तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा, असे या याचिकेत नमूद केले आहे.

Web Title: Polytechnic movement of defense online