'आयुष्यमान'तून गरीब आउट अन्‌ श्रीमंत इन !

तानाजी पवार
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

आयुष्यमान भारत योजनेतून तालुक्‍यातील अनेकांची नावे गायब झाली असल्यामुळे शासनाने फेरसर्वेक्षण करून या योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोचवावा. जेणेकरून ही योजनाही सफल होईल.
अमित जाधव, अध्यक्ष, कऱ्हाड उत्तर युवक कॉंग्रेस 

वहागाव ः गरीब, वंचित ग्रामीण कुटुंबांना आरोग्यसेवा मिळावी, हा मूळ उद्देश असणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे गायब झाल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोरगरीब जनतेला फटका बसणार आहे. 

राज्यातील 2011 च्या जनगणनेमधील नोंदीनुसार या योजनेसाठी सुमारे 84 लाख कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. त्यांना बारकोड असलेले कार्ड देण्यात आले आहे. त्यातील लाभार्थी कुटुंबांना ना सरकारी रुग्णालयांमध्ये वर्षभरात पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार, योजनेत समाविष्ट असलेल्या 971 सेवांव्यतिरिक्त सुमारे 400 आरोग्यसेवा मोफत मिळणार आहेत. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून, ग्रामीण भागातून 58 लाख आणि शहरी भागातून 24 लाख कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. 

गरिबांची नावे कट 

कऱ्हाड तालुक्‍यातील अनेक गोरगरीब, गरजू कुटुंबांची नावे या योजनेच्या यादीत अद्याप आली नसल्याचे दिसून येते आहे. या उलट अनेक श्रीमंतांचा या योजनेत समावेश झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात बसून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे गोरगरीब या योजनेपासून वंचित राहणार असल्याचा आरोप होतो आहे. 

फेरसर्वेक्षणाची मागणी 

कऱ्हाड तालुक्‍यातून अनेकांनी या योजनेसाठी आपली नावे दिली आहेत. परंतु, सर्वेक्षणाअंती प्रसिध्द झालेल्या यादीत अनेक नावे दिसत नाहीत. या योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना आरोग्यसुविधा नि:शुल्क उपलब्ध होण्यासाठी संबंधित शासनाकडून फेरसवेंक्षण करावे, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे. 

दुसऱ्या राज्यातही लाभ 

शहरी भागातील 11 वर्गातील कुटुंबांचा योजनेत समावेश केला आहे. त्यात कचरावेचक, बांधकाम मजूर, घरकाम करणारे, फेरीवाले, भिकारी आदी वर्गातील कुटुंबांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागामध्ये घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावत्या व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी वर्गातील कुटुंबांची निवड करण्यात आली आहे. योजनेशी जोडल्या गेलेल्या राज्यातील नागरिकांना दुसऱ्या राज्यातही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

कर्करोग, हृदयरोग... 25 सप्टेंबरपासून आयुष्यमान योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एकाचवेळी 445 जिल्ह्यांत ही योजना लागू होणार आहे. एकूण 13 हजार रुग्णालये या योजनेत सहभागी झाली आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत गरिबांना खासगी रुग्णालयातही चांगले उपचार मिळतील. त्यात कर्करोग, हृदयाचे आजार, किडनी व लिव्हरचे आजार, डायबिटीस यांसह सुमारे 1300 आजारांचा समावेश आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor out of life and rich in life ! Expose in Karad taluka