कृषी, ग्रामविकासातूनच सगळे प्रश्‍न सुटतील - पोपटराव पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सांगली - पाणी, पर्यावरण, कृषी आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन कामे केले पाहिजे. तरुणाईने कोणत्याही धर्माचा झेंडा उचलण्यापेक्षा याप्रश्‍नी सक्रिय सहभागाचा तिरंगा हाती घेतला तरच सध्याचा बेरोजगारीपासून ते आरक्षणापर्यंतचे प्रश्‍न सुटू शकतील, असे स्पष्ट मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

सांगली - पाणी, पर्यावरण, कृषी आणि ग्रामविकासाच्या मुद्द्यांवर देशातील सर्व पक्षांनी एकत्र येऊन कामे केले पाहिजे. तरुणाईने कोणत्याही धर्माचा झेंडा उचलण्यापेक्षा याप्रश्‍नी सक्रिय सहभागाचा तिरंगा हाती घेतला तरच सध्याचा बेरोजगारीपासून ते आरक्षणापर्यंतचे प्रश्‍न सुटू शकतील, असे स्पष्ट मत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सव प्रारंभानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, डॉ. बिराज खोलकुंबे आदी उपस्थित होते. 

देशातील आरक्षणाच्या सर्व मागण्या मान्य केल्या  तरी सर्व तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार नाही. कारण विषय खूप वेगळा आहे, असे सांगत श्री. पवार म्हणाले, ‘‘स्वतंत्र भारताची दिशा सांगताना महात्मा गांधीजींनी ग्रामीण भागात सर्वाधिक जनता राहते आणि तिच्याशी निगडित प्रश्‍नांवर सर्वात आधी काम करा, खेड्याकडे चला, असा संदेश दिला होता.

स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांत आपण ते करू शकलो का, यावर विचार करून पुढचे धोरण ठरविणे गरजेचे आहे. आरक्षणातून संरक्षण हवंय, मात्र त्यापलीकडे जाऊन मूळ विषयांना भिडण्याची गरज आहे. पाण्याचा ताळेबंद, पर्यावरण संवर्धन असे विषय अभ्यासक्रमात का नाहीत? 

आम्ही विकासदराची चर्चा करतो, मात्र त्या विकासातून किती लोकांना आनंद मिळतो? स्वातंत्र्य लढ्यात तरुणांना झपाटले होते, आता सारे सैराट आहेत. नक्की सैराट व्हा, मात्र पाणी आणि पर्यायवरणासारख्या प्रश्‍नांवर लढण्यासाठी व्हा.’’

ते म्हणाले,‘‘या देशातील भूक संपली आहे, मात्र  कुपोषण सुरू झालेय. किचनमध्ये आरोग्यासाठी नव्हे तर जीभेसाठी पदार्थ बनतात. शेतीत पाण्याचा बेसुमार वापर, रासायनिक खते, औषधांची प्रचंड मात्रा यामुळे कर्करोग, मधुमेहाची समस्या प्रचंड मोठी बनली आहे अशावेळी मुळातून बदलाची गरज आहे. फेसबूक, वॉटस्‌ॲप आणि टीव्हीच्या रिमोटनी बांधून घातलेला माणूस मोकळा करण्याची गरज आहे. तो निसर्गाशी जोडण्याची गरज आहे.’’

Web Title: Popatrao Pawar comment in Willingdon College Lecture