पोपटरावांमध्ये हे "पाणी' आलं कोठून, बघा तुम्हीच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

प्राध्यापकांचे मिळालेले सहकार्य, शिकवण व संस्था पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन, दिवंगत पदाधिकाऱ्यांचे प्रेम, ही माझ्या जीवनात पुढील वाटचालीस मिळालेली शिदोरी होती. आज महाविद्यालयाच्या आवारात आलो, की पावले आपसूक मैदानाकडे वळतात

नगर ः ""किशोरावस्थेपासूनच "जिल्हा मराठा'च्या मैदानाची ओढ लागली. या मैदानावर जय, पराजय, सहनशीलता, आनंद, संस्कार शिकता आले. सामाजिक जीवनात व पाणीप्रश्‍नावर जगभर काम करताना "जिल्हा मराठा'च्या मैदानावरील या संस्कारांमुळे जीवनातील प्रत्येक पायरीवर यशस्वी होत गेलो,'' असे मत जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे रेसिडेन्शिअल व न्यू आर्टस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा - इंदोरीकरमहाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी

जिल्हा मराठातर्फे सत्कार

पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे होते.

या मैदानावर घडलो

पवार म्हणाले, ""मैदान तयार करताना घेतलेली मेहनत, रेसिडेन्शिअल कनिष्ठ महाविद्यालयात व न्यू आर्टस महाविद्यालयात पदवी शिक्षण घेताना प्राध्यापकांचे मिळालेले सहकार्य, शिकवण व संस्था पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन, दिवंगत पदाधिकाऱ्यांचे प्रेम, ही माझ्या जीवनात पुढील वाटचालीस मिळालेली शिदोरी होती. आज महाविद्यालयाच्या आवारात आलो, की पावले आपसूक मैदानाकडे वळतात. याच मैदानावरील संस्कारांमुळे देशभर "पाणी' या विषयावर काम करू शकलो. पाण्याचे महत्त्व व आपले भविष्य, याविषयी महत्त्व पटवून देऊ शकलो.'' 

नंदकुमार झावरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. जी. डी. खानदेशे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पवारांचा परिचय प्रा. सुनीता शेटे, सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. आभार प्राचार्य बी. एच. झावरे यांनी मानले. "जिल्हा मराठा'चे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popatrao Pawar learned on the grounds of New Arts College