लोकसंख्या 10 लाख, मातीच्या मूर्ती फक्त तीन हजार

परशुराम कोकणे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी सकारात्मक चित्र दिसत असले तरी मूर्तिकारांच्या मते शहरात फक्त तीन हजारच मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जात आहेत. मागणी कमी असल्याने मूर्तिकार धाडस करत नाहीत, महापालिका आणि सामाजिक संस्थांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक प्रबोधनाची गरज आहे. 

सोलापूर: स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी सकारात्मक चित्र दिसत असले तरी मूर्तिकारांच्या मते शहरात फक्त तीन हजारच मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जात आहेत. मागणी कमी असल्याने मूर्तिकार धाडस करत नाहीत, महापालिका आणि सामाजिक संस्थांकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक प्रबोधनाची गरज आहे. 

दिसायला आकर्षक आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींना अधिक मागणी आहे. शहरात पूर्व भागात मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय केला जातो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीच्या तुलनेत मातीपासून बनविण्यात येणाऱ्या मूर्तींची संख्या फारच कमी आहे. शहराची लोकसंख्या जवळपास 10 लाख आहे. त्यातील अंदाजे चार लाख लोक गणेशोत्सव साजरा करत असतील तर मातीच्या गणेशमूर्ती तीन हजार इतक्‍याच आहेत. 

वर्ष, सहा महिने झाले तरी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती विरघळत नाहीत. शहरात संभाजी तलाव, सिद्धेश्‍वर तलाव, हिप्परगा तलाव, होटगी तलाव यासह विविध विहिरींमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्याने सिद्धेश्‍वर तलावातील न विरघळलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती वर आल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. या उलट शाडू माती, बॉम्बे माती आणि कापसापासून बनवलेल्या गणेशमूर्ती केवळ अर्धा ते एक तासात विरघळतात, पर्यावरण संवर्धनासाठी सोलापूरकरांनी मातीच्याच गणेशमूर्तींची स्थापना करावी, असे आवाहन मूर्तिकार विष्णू सगर यांनी केले आहे. 

आम्ही गेल्या 50 वर्षांपासून मातीच्या गणेशमूर्ती बनवतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सकारात्मक चर्चा होत असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत मागणी कमी असल्याने शहरात खूपच कमी मातीच्या मूर्ती बनविल्या जात आहेत. आम्ही यंदा 600 मातीच्या मूर्ती बनविल्या आहेत. स्मार्ट सोलापूरकरांनी पर्यावरण संवर्धनासाठी मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करावी. - विष्णू सगर, मूर्तिकार 

प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या गणेशमूर्ती वर्ष झाले तरी विरघळत नाहीत. तलावातील पाणी कमी झाल्यानंतर मूर्तींची विटंबना झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सोलापूरकरांनी काळानुसार बदलायला हवे. घरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मातीच्या गणेशमूर्तींची स्थापना करायला हवी. आम्ही शाळा आणि महाविद्यालयात जाऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात प्रबोधन करणार आहोत. -मंदार कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Population 10 million and ganesh idol only three thousand