लोकसंख्या ४० हजार... उद्यान एकच!

भद्रेश भाटे
गुरुवार, 6 एप्रिल 2017

वाई - उन्हाळ्याच्या सुटीत लहान मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठांना विरंगुळा म्हणून निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासाठी वाई शहरात उद्यानाची पुरेशी सुविधा नाही. सोनगीरवाडीतील शांताश्रम मठ उद्यान बंद आहे. नदीकाठावरील नियोजित वीर जिवा महाले उद्यान अद्याप कागदावरच आहे. ब्राह्मणशाहीतील छत्रपती शिवाजी उद्यान सुस्थितीत असल्याने या बागेत प्रचंड गर्दी असते. मात्र, पुरेशी खेळणी नसल्याने तेथेही बालगोपाळांच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे दिसते.   

दक्षिण काशी व तीर्थक्षेत्र वाई शहराची लोकसंख्या सुमारे ४० हजार आहे. कृष्णा तीरावरील महागणपतीच्या दर्शनासाठी अनेक भाविक व पर्यटक येतात. शहरात लोकसंख्येच्या तुलनेत उद्यानांची सुविधा नाही. ब्राह्मणशाही येथे छत्रपती शिवाजी उद्यान ही सर्वांत जुनी बाग आहे. चार वर्षांपूर्वी पालिकेने या उद्यानाचा विकास केला. या ठिकाणी दोन घसरगुंड्या व झोपाळे, जंगल जीम, सी-सॉ, नागमोडी व बोगदा घसरगुंडी अशी विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली. फुलझाडे, हिरवळ, पथमार्गाबरोबरच दोन आकर्षक कारंजे उभारण्यात आल्याने बालगोपाळांना व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची चांगली सोय झाली. उद्यान देखभालीसाठी मागील वर्षी दरमहा ४० हजार रुपये खर्चाचा ठेका देण्यात आला. सायंकाळी पाच ते साडेसातपर्यंत हे उद्यान खुले असते. मात्र, नागमोडी व बोगदा घसरगुंडीची दुरवस्था झाली आहे. या उद्यानाच्या बाहेर अनेक वडाप तसेच नादुरस्त गाड्या उभ्या असतात. त्यामुळे नागरिकांना दुचाकी लावता येत नाहीत.सोनगीरवाडीतील शांताश्रम मठ उद्यान अनेक दिवसांपासून बंद आहे. येथील झाडे तोडण्याचा प्रयत्न पालिकेकडून झाला. मात्र, वृक्षप्रेमींनी विरोध केल्याने ही मोहीम थांबविण्यात आल्याचे समजते. 

महागणपतीच्या समोर कृष्णातीरावर सुमारे एक कोटी ६१ लाख रुपये खर्च करून पालिकेने दगडी घाट विकसित केले आहेत. या ठिकाणी वीर जिवा महाले उद्यान सुरू करण्यात येणार आहे. मात्र, सध्या तरी ते कागदावरच आहे. हे काम रखडल्याने त्या ठिकाणी वडाप गाड्यांचा वाहनतळ झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत शहराच्या विविध भागात शहराच्या वैभवात भर घालणारी छोटी-छोटी उद्याने उभारली पाहिजेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

Web Title: The population of 40 thousand ... one garden!