वाहतूक पोलिसांच्या हातात येणार पॉस मशिन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

पॉस मशिनसंदर्भात दोन बॅंकांशी चर्चा झाली आहे. लवकरच दंड वसुलीसाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडे ही मशिन देण्यात येतील.


- रवींद्र सेनगावकर,
पोलिस आयुक्त,सोलापूर

दंड वसुलीवर परिणाम; बेशिस्त वाहनधारकांना भरावा लागणार ऑनलाइन दंड

सोलापूर : पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद झाल्याचा परिणाम वाहतूक नियंत्रण शाखेच्या दंड वसुलीवरही झाला आहे. सगळीकडे ऑनलाइन व्यवहार होत असताना आता पोलिस प्रशासनही मागे कसे राहील. वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना दंड वसुलीसाठी लवकरच पॉस स्वॅप मशिन देण्यात येणार आहेत.

नोटाबंदीनंतर वाहतुकीचे नियम मोडणारे हजारो वाहनचालक पैसे नाहीत, असे सांगत आहेत. त्यामुळे पोलिस त्यांच्याकडून मिळेल तेवढी रक्कम घेऊन दंड वसुली करीत आहेत. अनेकांना तर केवळ ताकीद देऊन सोडले जाते. कॅशलेस दंडवसुली करता येईल का याचा विचार पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर करीत आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या सहायक आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर यांनी दोन बॅंकांकडून माहिती मागविली आहे. वाहतूक पोलिसांकडे लवकरच पॉस स्वॅप मशिन दिसण्याची शक्‍यता आहे. या मशीनच्या साहाय्याने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांच्या खात्यातून दंड म्हणून ऑनलाइन पैसे घेतले जातील.

 

Web Title: Pos machine will be in the hands of the traffic police