सार्वजनिक जागा दलालांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

सातारा - शहरातील रविवार पेठेतील जुन्या भाजी मंडईत अतिक्रमणांची बजबजपुरी झाली आहे. जागा सार्वजनिक असली तरी काही दलालांच्या हातात तेथील सत्ता आहे. त्यांच्या परवानगीशिवाय या गल्लीतील पानही हालत नाही. या ठिकाणची हप्तेखोरी मोडून रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे आव्हान पालिका व पोलिस प्रशासनापुढे आहे.

सातारा - शहरातील रविवार पेठेतील जुन्या भाजी मंडईत अतिक्रमणांची बजबजपुरी झाली आहे. जागा सार्वजनिक असली तरी काही दलालांच्या हातात तेथील सत्ता आहे. त्यांच्या परवानगीशिवाय या गल्लीतील पानही हालत नाही. या ठिकाणची हप्तेखोरी मोडून रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याचे आव्हान पालिका व पोलिस प्रशासनापुढे आहे.

कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानंतर साताऱ्यात अतिक्रमणविरोधात आघाडी उघडण्यात आली. सध्या या मोहिमेने ब्रेक घेतला असला तरी ‘ब्रेक के बाद’ प्रशासनाच्या अजेंड्यावर रविवार पेठ जुन्या मंडईचा विषय घेण्याची गरज आहे. शिक्षक बॅंकेसमोर, कासट मार्केटच्या मागून एक रस्ता तहसीलदार कार्यालयाकडे जातो. कर्मवीर पथावरून मुख्य बस स्थानकाकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता. या रस्त्यामुळे शिवाजी सर्कल सिग्नलवरील ताण कमी होणार आहे.

पूर्वी या ठिकाणी भाजी मंडई भरत होती. नंतर ती जवळच्या माळावर हलविण्यात आली. रिकामी झालेली रस्त्याकडेची जागा काही दलालांनी ताब्यात घेतली. पालिकेच्या गटारांवर खोकी टाकून त्यांनी ती भाड्याने दिली. अतिक्रमण मोहीम निघाली की, काही दिवस या ठिकाणची खोकी बंद ठेवली जातात. प्रशासनही विशिष्ट दबावाखाली येते. चार दिवसांत पुन्हा अतिक्रमणे ‘जैसे थे’ उभी राहतात. 

या रस्त्यावर केवळ खोक्‍यांचीच अतिक्रमणे आहेत, असे नाही. शिक्षक बॅंकेपासून अतिक्रमणांना सुरवात होते. एका व्यापारी संकुलाच्या दारात पेव्हर टाकून रस्ता रुंदीकरणासाठी सोडलेल्या जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे. त्याच्याबाहेर वाहनांचे पार्किंगही होते. पालिकेने हे पेव्हर काढून रस्त्याच्या समांतर सपाटीकरण करून डांबरीकरण करावे म्हणजे त्या ठिकाणी वाहने पार्क होतील आणि रस्ता रहदारीसाठी मोकळा होईल. 

पुढे काही दुकानदारांची दारात अतिक्रमणे आहेत. रस्त्यात दुतर्फा पार्किंगमुळे हा रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. कोणी चिकन, सोडे-बोंबील, रस गुऱ्हाळ अशी दुकाने थाटली आहेत. पालिकेची त्याला परवानगी नाही. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ५० खोक्‍यांची अतिक्रमणे आहेत.

गुंडाराज मोडण्याचे आव्हान...
रविवार पेठ जुन्या मंडईतील अतिक्रमणे साफ करून तेथील गुंडाराज मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. खोकीधारकांकडून दरमहा गोळा होणाऱ्या वर्गणीतून गुंड पोसले जातात. पोलिस अगर पालिकेने कारवाईचा प्रयत्न केल्यास आर्थिक हितसंबंध गुंतले असलेली काही मंडळी महिलांना पुढे करून रस्त्यावर राडा घालतात. काळेधंदे करणाऱ्यांचे कंबरडे मोडायचे असेल तर पहिला हातोडा येथील अतिक्रमणांवर घालायला हवा. पोलिस यंत्रणेला हे माहीत नाही, असे नाही. परंतु, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, असा त्यांच्यापुढे प्रश्‍न आहे!

Web Title: Possession of public space agents