सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पावसाची शक्‍यता धूसर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापर्यंत कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी दररोज रडारच्या माध्यमातून आईस क्रिस्टल व पाण्याचे थेंब असलेल्या ढगांचा शोध सुरू आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जातोय, किती पाऊस पडला, तो कृत्रिम की नैसर्गिक, ते आता सांगता येणार नाही. 

- डॉ. तारा प्रभाकरन, प्रकल्प संचालिका 

सोलापूर : काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपातील उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सोलापूर विद्यापीठाजवळील सिंहगड कॉलेज ते जिल्ह्याच्या 200 किलोमीटर परिसरातील ढगांचा शोध सुरू आहे. त्यासाठी दररोज 10 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 

जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू असून त्याबाबत क्‍लाऊड एअरोसोल इंटरऍक्‍शन अँड प्रेसिपिटेशन एन्हान्समेंट एक्‍सप्रिमेंटच्या (कायपिक्‍स) टीमने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन सद्य:स्थितीची माहिती दिली. या वेळी "कायपिक्‍स'चे वैज्ञानिक डॉ. शिवसाई दीक्षित, डॉ. प्रदीप सफई उपस्थित होते. या वेळी प्रकल्प संचालिका तारा प्रभाकरन म्हणाल्या, हैदराबाद, वाराणसी, औरंगाबाद या ठिकाणी कृत्रिम पावसाचे प्रयोग यापूर्वी करण्यात आले आहेत. आता सोलापूर जिल्ह्यातील सिंहगड कॉलेज आणि तुळजापूर येथील तुळजाभवानी महाविद्यालयाबरोबर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटीओरोलॉजीने करार केला. त्यानुसार जिल्ह्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू आहे. 

ठळक बाबी... 

- जिल्ह्यात 80 ठिकाणी बसविले पर्जन्यमापक 
- क्षारांच्या फवारणीनंतर किती वेळात, कोणत्या ठिकाणी, किती पाऊस पडणार याची पडताळणी होणार 
- ढगांची रचना, हवेतील सूक्ष्मकणांचा ढगावरील परिणाम याचा अभ्यास सुरू 
- ढगांमध्ये क्षार फवारणी व वैज्ञानिक नोंदीसाठी दोन विमाने सज्ज 
- एका विमान ढगांमध्ये क्षार फवारणीसाठी तर दुसरे ढगांमधील प्रक्रियांच्या नोंदीसाठी 
- दररोजच्या ढगांची स्थिती अभ्यासण्याकरिता "सिंहगड'वर बसविले सी बॅण्ड रडार 
- सप्टेंबरपर्यंत 240 तास चालणार प्रयोग : आतापर्यंत 67 तास झाले 

सोलापूर जिल्ह्यातील कृत्रिम पावसाच्या प्रयोगाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना मे 2017 मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तरीही त्यांना काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु, आम्ही केलेल्या पत्रव्यवहाराची प्रत त्यांना देण्यात आली आहे. 

- डॉ. शिवसाई दीक्षित, वैज्ञानिक

Web Title: The possibility of artificial rain in Solapur district was might not possible