पिग्मी एजंटांना लुटणाऱ्या टोळीची शक्‍यता

पिग्मी एजंटांना लुटणाऱ्या टोळीची शक्‍यता

वडूज - बॅंकेचे कलेक्‍शन करणाऱ्या पिग्मी एजंटंना लुटण्याचे प्रकार घडू लागल्याने या प्रकारात मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पिग्मी एजंटंना लुटणाऱ्या या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

वडूज हे खटाव तालुक्‍याचे मुख्यालय असल्याने येथे अनेक शासकीय, खासगी मोठ्या बॅंका आहेत. शिवाय काही शेड्युल्ड बॅंका, पतसंस्थादेखील आहेत. यापैकी काही बॅंकांच्या ठेव प्रतिनिधींकडून (पिग्मी एजंट) शहरात फिरून दैनंदिन ठेव गोळा करण्याचे काम केले जाते, तर ग्रामीण भागांत बॅंका, पतसंस्थांची संख्या अभावानेच असल्याने काही बॅंकांचे दैनंदिन ठेव प्रतिनिधी (पिग्मी एजंट) नजीकच्या महत्त्वाच्या लहान गावे, वाड्यावस्त्यांवर जाऊन तेथील लहान मोठ्या व्यावसायिकांच्या ठेवी गोळा करण्याचे काम करीत आहेत. साधारणत: दुपारनंतर ग्रामीण भागांत ठेवी गोळा करण्यासाठी सुरू होणारा प्रवास रात्री किमान नऊ वाजेपर्यंत तरी सुरूच असतो. त्यामुळे त्यांना रस्त्यात अडवून मारहाण करून लुटण्याचे प्रकार घडू लागले आहेत. 

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपूर्वी भुरकवडी येथे एका बॅंकेच्या दैनंदिन ठेव गोळा करणाऱ्या प्रतिनिधीला लुटण्याची घटना घडली होती. त्या वेळी अज्ञात लुटारूंनी चारचाकी वाहनाचा वापर करून त्याला मारहाण करून लुटले होते. या प्रकाराचा ससेमिरा मागे नको म्हणून संबंधिताने पोलिसांपर्यंत जाण्याचे टाळले होते. या घटनेला काही कालावधी जातो न्‌ जातो तोच रविवारी (ता. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रमेश शिंगाडे (रा. गणेशवाडी) या पिग्मी एजंटला वडूज- कऱ्हाड रस्त्यावर भावलिंग डोंगरात दोन लाख १५ हजार रुपयांना लुटले. पिग्मी एजंटला आडमार्गावर गाठून त्याला लुटण्याच्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. या घटनांमुळे परगावी जाऊन दैनंदिन ठेव गोळा करणारे पिग्मी एजंट भीतीच्या सावटाखाली आहेत. पिग्मी एजंटला लुटणारी मोठी व सराईत टोळी असण्याची शक्‍यता असून, या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

पिग्मी एजंटना अडवून लुटण्याच्या प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. एजंटांनी रात्री उशिरापर्यंत ठेवी गोळा करण्यापेक्षा सकाळी ते दुपारपर्यंत अशा दिवसा उजेडाच्या वेळेतच हे काम करावे. एजंटांना ठेवी गोळा करण्यासाठी होणारा उशीर लक्षात घेऊन याबाबत बॅंकांच्या अधिकाऱ्यांशी बोलून काही पर्यायी उपाययोजना करण्याबाबत चर्चा करू.
- धरणीधर कोळेकर, सहायक पोलिस निरीक्षक, वडूज पोलिस ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com