‘पोस्टल पेमेंट बॅंक’ २१ ला सेवेत

सुधाकर काशीद
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - ‘पोस्टात पैसे ठेवलेत, चिंता नाही..’ या सर्वसामान्यांमध्ये विश्‍वासाचे ठिकाण असलेल्या पोस्ट ऑफिसचे रूपांतर आता इंडियन पोस्टल पेमेंट बॅंकेत होत आहे. देशातील ६५० शाखांचे उद्‌घाटन २१ ऑगस्टला होणार आहे.

कोल्हापूर - ‘पोस्टात पैसे ठेवलेत, चिंता नाही..’ या सर्वसामान्यांमध्ये विश्‍वासाचे ठिकाण असलेल्या पोस्ट ऑफिसचे रूपांतर आता इंडियन पोस्टल पेमेंट बॅंकेत होत आहे. देशातील ६५० शाखांचे उद्‌घाटन २१ ऑगस्टला होणार आहे.

विशेष म्हणजे, देशभरातील ६५० शाखांमध्ये कोल्हापुरातील पाच शाखांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते िव्हडिओ कॉन्फरन्सद्वारे या सर्व शाखांचे एकाच वेळी उद्‌घाटन केले जाणार आहे. 

कोल्हापुरातील रमणमळा येथील मुख्य पोस्ट ऑफिस, मार्केट यार्ड, शुक्रवार पेठ, उचगाव आणि हेर्ले या पाच पोस्ट ऑफिसमध्ये या बॅंकेचे कामकाज सुरू होणार आहे. टपाल, रजिस्टर, स्पीड पोस्ट, पोस्ट बचत या पारंपरिक कामाबरोबरच आता या पोस्ट कार्यालयात स्वतंत्र बॅंक व्यवहार चालणार आहेत. टपाल कार्यालयाचा लूक बदलला आहे. ठरावीक ठसा असलेले फर्निचर, खुर्च्या, पंखे असले पारंपरिक स्वरूप बदलून अत्याधुनिक हायटेक ऑफिसमध्ये रूपांतर झाले आहे. 

राष्ट्रीयीकृत बॅंकांत ज्या सेवा मिळतात, त्याच स्वरूपाच्या सेवा पोस्टाच्या या बॅंकेत आहेत. मात्र, या बॅंकेत बचत खात्यात एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवता येत नाहीत. आणि मुदतबंद ठेवीची सुविधा नाही. एटीएम सुविधाही असून, खात्यात झालेल्या व्यवहाराचा एसएमएस अलर्टही मिळू शकणार आहे. पोस्टाच्या या बॅंकेत १० वर्षांवरील कोणतीही व्यक्ती खाते उघडू शकणार आहे. 

खाते उघडण्यास १०० रुपये पुरेशे
पोस्टाच्या या बॅंकेत घरात येऊन पैसे स्वीकारण्याची किंवा घरात येऊन पैसे देण्याची सुविधा असणार आहे. खाते उघडण्यासाठी १०० रुपये पुरेसे आहेत. कमीत कमी खात्यावर किती पैसे असावेत, याचीही मर्यादा नाही. त्यामुळे विशिष्ट रक्कम खात्यावर शिल्लक असलीच पाहिजे, अशीही अट नाही.

पोस्टल पेमेंट बॅंक उद्‌घाटनाची तयारी चालू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिल्लीतून उद्‌घाटन होईल. कोल्हापुरात हा समारंभ सर्वांना पाहता येईल. या समारंभासाठी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे.
 - आय. डी. पाटील,
प्रवर अधीक्षक, कोल्हापूर

Web Title: Postal Payment Bank 5 branches in Kolhapur