जरळीच्या पोस्टमनचा शेतीच्या वादातून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

गडहिंग्लज - जरळी (ता. गडहिंग्लज) येथील पोस्टमन शिवणाप्पा अण्णाप्पा बाबाण्णावर यांचा खून वडिलोपार्जित शेतीच्या वादातून झाल्याचे आज स्पष्ट झाले. या प्रकरणी मृताचा सख्खा पुतण्या रवींद्र गुरुपादप्पा बाबाण्णावर यास पोलिसांनी बारा तासांच्या आत आज सकाळी अटक केली. बुधवारी (ता. 29) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती.

गडहिंग्लज - जरळी (ता. गडहिंग्लज) येथील पोस्टमन शिवणाप्पा अण्णाप्पा बाबाण्णावर यांचा खून वडिलोपार्जित शेतीच्या वादातून झाल्याचे आज स्पष्ट झाले. या प्रकरणी मृताचा सख्खा पुतण्या रवींद्र गुरुपादप्पा बाबाण्णावर यास पोलिसांनी बारा तासांच्या आत आज सकाळी अटक केली. बुधवारी (ता. 29) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली होती.

मृत शिवणाप्पा, मलाप्पा व गुरुपादप्पा असे तिघे भाऊ. तिघांचीही कुटुंबे विभक्त आहे. वीस वर्षांपूर्वीच वडिलोपार्जित शेतीची वाटणी झाली आहे. त्यानुसार छपरे कोपऱ्यर्जिील 24 गुंठे शेतीचीही समान वाटणी झाली. बारा वर्षांपूर्वी कर्जबाजारीमुळे गुरुपादप्पाने यातील आपल्या हिस्स्याची 8 गुंठे जमीन विक्रीस काढली. त्यावेळी शिवणाप्पा यांनीच ही जमीन 1 लाख 70 हजार रुपयाला खरेदी घेतली.

दरम्यान, गतवर्षापासून गुरुपादप्पाचा मुलगा रवींद्रने, खरेदी दिलेली जमीन शिवणाप्पा यांच्याकडून परत मागत होता. त्यासाठी रवींद्र वारंवार दारू पिऊन शिवणाप्पांना शिविगाळ व मारण्याची धमकी देत होता. चालू दरानुसार किंमत देऊन जमीन परत घेण्याची सूचनाही शिवणाप्पा यांनी रवींद्रला केली होती, परंतु चालू किंमत देण्यास त्याचा नकार होता. याच कारणावरून तीन महिन्यांपूर्वी रवींद्र दारू पिऊन शिवणाप्पा यांच्या घराच्या दरवाजाला लाथा मारत शिविगाळ करत होता. त्याचा जाब विचारताच रवींद्रने शिवणाप्पांना मारहाण केली होती. त्यावेळी त्यांनी रवींद्रविरुद्ध पोलिसात तक्रारही दिली होती. तेव्हापासून रवींद्र हा शिवणाप्पा यांच्यावर चिडून होता. रोज सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी येणारे शिवणाप्पा घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा सायकलीने घराकडे जात होते. निर्मनुष्य रस्ता, काळोख आणि शिवणाप्पा एकटे असल्याची संधी साधत रवींद्रने त्यांना दुंडाप्पा जनवाडे यांच्या शेताजवळ गाठून मारहाण सुरू केली. त्याचवेळी कोणत्या तरी कठीन वस्तूने शिवणाप्पा यांच्या डाव्या डोळ्यावर व डोकीत वर्मी घाव घातल्याने ते जागीच ठार झाले. याबाबतची फिर्याद मृत शिवणाप्पाचा मुलगा अरुणने पोलिसांत दिली आहे. पोलिस निरीक्षक व्ही. व्ही. हसबनीस अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल लोकेशनद्वारे तपास
चुलत्याचा खून करून रवींद्र फरार झाला होता. रात्रभर पोलिसांनी शोध घेतला. दरम्यान, त्याचा मोबाइल सुरूच असल्याने पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले. घटनास्थळापासून एक किलोमीटरवरील शेतवडीत तो झोपल्याचे स्पष्ट झाले. तेथून त्याला ताब्यात घेतल्याचे निरीक्षक श्री. हसबनीस यांनी सांगितले.

Web Title: postman murder in jarali