बटाटा शेतीही नुकसानीत!

बटाटा शेतीही नुकसानीत!

खटाव - निसर्ग प्रतिकूल असूनही खटाव तालुक्‍यात शेतकऱ्यांनी बटाट्याचे पीक घेतले. मात्र, सध्या दर पडल्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आगामी काळातील दुष्काळाचे संकट आणि बटाट्यात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहे.

खटाव तालुक्‍यातील बहुतांश भागात खरिपात बटाट्याची लागण होते. बटाटा व आल्याचे पीक हे भांडवली पीक आहे. या पिकाला एकरी ७० हजारांच्या आसपास खर्च येतो. या वर्षी बटाट्याचे बियाणे दोन हजार ७०० पासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत दराने शेतकऱ्यांनी खरेदी केले. खते, कीटकनाशक फवारणीलाही मोठा खर्च होतो. मजुरांचा खर्च वेगळाच. बहुतांश शेतकऱ्यांनी पतसंस्था, सोसायटी, बचत गट वा राष्ट्रीयीकृत बॅंकेतून कर्ज काढून बटाट्याचे पीक घेतलेले असते.

सुमारे तीन महिने जोपासलेले पीक शेतकरी बाजारात विक्रीसाठी घेऊन जातो. मात्र, सध्या दर पडल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच करार पद्धतीने केलेला बटाटाच खरेदी करण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे. कंपन्यांशी करार केलेला बटाटा १६०० ते १७०० क्विंटल दराने खरेदी करण्यात येत आहे. ज्यांनी करार केला नाही, त्यांच्या बटाट्याला वेगळ्या दरात खरेदी केली जात आहे.  करार न केलेल्या बटाट्याला १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटल दर सुरू आहे. या दरात काहीच परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कंपन्यांनी माल खरेदी करण्याचा कोटा पूर्ण केला म्हणून माल घेणे बंद केले आहे. चार पैसे होतील या आशेने एवढे कष्ट घेतले आणि ते कष्ट वाया जात आहेत, हे लक्षात आल्यावर शेतकरीही खचून गेला आहे.

परिश्रम घेऊन पिकाला घातलेले भांडवल व प्रत्यक्ष उत्पन्न याचा मेळ जुळत नसल्याने शेतकरी निराश आहेत. खरीप हंगामावर शेतकऱ्याचे कुटुंबाचे वार्षिक बजेट ठरलेले असते. त्यातच इथून पुढे दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्याचे आव्हान आहे. एकंदरीतच प्रतिकूल हवामान असूनही जिवाचं रान करून शेतात बटाटा चांगला जोपासला. पण, दराअभावी आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला दिसतो.

या हंगामात बटाट्याचे पैसे नक्की होणार, अशी बाजारपेठेत चर्चा असल्याने शेतकरी चार पैशाच्या आशेने या पिकाकडे वळला. मात्र, दर पडल्यामुळे दिवस-रात्र केलेल्या कष्टाचे चीज झाले नाही. 
- दत्तात्रय भोईटे,  शेतकरी, जांब (ता. खटाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com