...म्हणून कर्नाटकातील पोल्ट्री व्यवसायिकांना गोव्यात बंदी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच गोवा सरकारने बेळगावसह कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांना आपल्या राज्यात येण्यास बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री चालक आर्थिक संकटात सापडले आहेत.

बेळगाव ः कोरोनामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच गोवा सरकारने बेळगावसह कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांना आपल्या राज्यात येण्यास बंदी घातल्यामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे गोवा सरकारने बंदीचा आदेश तात्काळ मागे घेण्याची मागणी उद्योजक, क्वालिटी प्रॉडक्‍टचे अजित लोकूर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्याकडे केली. 

लॉकडाऊन काळात सुमारे दोन महिने पोल्ट्री व्यवसाय बंदच होता, सध्या टप्याटप्याने पोल्ट्री व्यवसायिक पूर्वपदावर येत आहेत. जिल्ह्यातील पोल्ट्री चालकांना जून महिन्याच्या प्रारंभी नव्या पक्ष्यांची (कोंबड्या) अपेक्षा आहे. बेळगावसह कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांना गोव्यात बंद आहे. त्यामुळे तयार झालेल्या पक्षांसाठी ही बंदी उठविणे गरजेची आहे. यासाठी गोवा सरकारकडून बंदी उठविण्यात यावी अशी मागणी पोल्ट्री चालकांनी केली आहे. 

बेळगावसह राज्यातील प्रमुख पोल्ट्री उत्पादन पुरवठादार गोव्याला मोठ्या प्रमाणात कोंबडी व अंडी पाठवितात. पोल्ट्री उत्पादनाच्या बाबतीत बेळगाव परिसराची तक्रार नाही परंतु स्वतःच्या आणि पोल्ट्री चालकांच्या हितासाठी गोवा सरकारने कर्नाटकातील पोल्ट्री उत्पादनांवर घातलेली बंदी मागे घ्यावी अशी पोल्ट्री चालकांनी मागणी केली आहे. 

सध्या गोवा राज्यातील बंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर मोठा प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे मंत्री अंगडी यांनी गोवा सरकारशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poultry traders from Karnataka banned in Goa