यंत्रमागधारकांचा २६ रोजी बंद

यंत्रमागधारकांचा २६ रोजी बंद

इचलकरंजी - यंत्रमागधारकांच्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबरला इचलकरंजी बंदची घोषणा आज केली. यंत्रमागधारक संघटना समन्वय समितीतर्फे झालेल्या यंत्रमागधारक मेळाव्यात निर्णय झाला. समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे अध्यक्षस्थानी होते. 

हा बंद यशस्वी करण्याचा निर्धार वक्‍त्यांनी व्यक्त केला. दोन महिन्यांत योग्य निर्णय न झाल्यास राज्यातील एक लाख उद्योजक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णयही झाला. राज्यातील यंत्रमाग व्यवसायाला वीज आणि व्याज दरात सवलत मिळावी, यासाठी समितीतर्फे व्यापक लढा सुरू आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी मेळावा झाला.
दीपक राशिनकर यांनी आमदार सुरेश हाळवणकर व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी एकत्र येऊन या प्रश्‍नाची तड लावावी, अशी मागणी केली.

पुंडलिक जाधव यांनी रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जे आमच्या भाकरीकडे बघतील, त्यांनाच सत्तेत आणू, असा इशारा दिला. पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी पॉवरलूमच्या कोणत्याही प्रश्‍नावर नेत्यांनी खिल्ली उडवू नये, अशी विनंती केली. 

माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, ‘आमदार हाळवणकर सवलतीसाठी अर्ज नाहीत असे म्हणतात. मात्र, प्रत्यक्षात सोलापूर कार्यालयात २३७५ अर्ज प्रलंबित आहेत. गावातील दोन हजार यंत्रमागधारकांनी कारखाने बंद केले आहेत. हेच यंत्रमागधारक आता यंत्रमागावर पाळी करण्यासाठी काम शोधत आहेत.’ सचिन हुक्कीरे, विश्‍वनाथ मेटे, विश्‍वनाथ अग्रवाल, विकास चौगुले आदी उपस्थित होते.

भिकाऱ्यासारखी अवस्था ः महाजन
राज्य शासनाकडे किमान दोन तरी सवलती द्याव्यात, अशी मागणी कित्येक वर्षे करीत आहोत. मात्र, आश्‍वासनापलीकडे काहीच होत नाही. वारंवार मागणी करीत यंत्रमागधारकांची अवस्था भिकाऱ्यांसारखी झाली आहे, अशी खंत विनय महाजन यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com