मुसळधार पावसात वीज कर्मचाऱ्यांची शर्थ 

मुसळधार पावसात वीज कर्मचाऱ्यांची शर्थ 

कोल्हापूर - पावसाचा डोळा उघडला नव्हता. त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क, स्टेशन रोड परिसर, दाभोळकर कॉर्नरपर्यंतच्या भागात वीजपुरवठा ठप्प. तर बापट कॅम्प परिसरातील कत्तलखाना परिसरात पंचगंगा नदीच्या पुराच्या फुगवट्यात वीज वाहिनीवर साप चढल्याने तेथेही वीज पुरवठा खंडीत झाला. या दोन्ही कामात विज कर्मचाऱ्यांनी घेतलेले श्रम खरोखरच काैतुकास्पद आहेत. 

वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नागरिकांचे उपकेंद्रात फोनवर फोन. या स्थितीत महावितरणचे कर्मचारी शिडी घेऊन बिघाड दुरुस्तीच्या कामाला लागले. इन्सुलेटर बदलणे तसे अवघडच काम; मात्र पावसाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी शर्थीने अवघ्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत केला. 

काल रात्रीपासून पावसाचा जोर सुरू आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नागाळा पार्क 33 केव्ही उपकेंद्राला बापट कॅम्प येथून सदर बाजारमार्गे येणाऱ्या वाहिनीद्वारे वीजपुरवठा होतो. ही वाहिनी आज (ता. 30) सकाळी 6:45 च्या सुमारास नादुरुस्त झाली. 

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क, स्टेशन रोड परिसर, दाभोळकर कॉर्नरपर्यंतच्या भागातील वीजपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे तो लवकर सुरू करावा, अशी मागणी नागरिकांतून सुरू झाली. पाऊस काही थांबत नव्हता. 

महावितरण उत्तर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके, शाखा अभियंता अभय आळवेकर व शकील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वीज कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधमोहीम हाती घेतली. दुपारच्या सुमारास सदर बाजारातील काही खांबांवर इन्सुलेटर फुटल्याचे आढळले.

भर पावसात ते बदलण्याचे काम केले. तोंडावर पडणारे पावसाचे थेंब कामात अडथळा आणत होते; मात्र कर्मचारी त्याची पर्वा न करता काम करत होते. दुपारी 2:10 च्या सुमारास नागाळा पार्क वीज उपकेंद्राला येणारा वीजपुरवठा सुरू झाला. पण, उपकेंद्रातून निघणाऱ्या 11 केव्ही वाहिनीतही बिघाड झाला होता. हा बिघाड शोधून परिसराचा वीजपुरवठा सुरू करण्यास कर्मचाऱ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागले. अखेर साडेचारच्या सुमारास सर्व वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळाले. 

यांनी केली मोहीम फत्ते 
जनमित्र गोकुळ साळुंके, अनिल कोळी, संतोष केसरकर, शैलेश खरात, सागर कांबळे, राजू पाटील, प्रवीण राठोड, वसंत जाधव, महेश सुतार, हेमंत मेश्राम, व्यंकटेश गायकवाड, विक्की मानवटकर, योगेश पाटील यांच्यासह बाह्यस्रोत कामगार राहुल भालबर, विक्रांत कवडे यांनी ही कामगिरी केली. 

वीज वाहिनीवरील साप हटवला

बापट कॅम्प परिसरातील कत्तलखाना परिसरात पंचगंगा नदीच्या पुराच्या फुगवट्यात वीज वाहिनीवर चढलेल्या सापाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. तो वाहिनीवर चढल्याने वीज पुरवठा खंडित तर झालाच; शिवाय सापाचाही मृत्यू झाला. कर्मचाऱ्यांनी एका लाकडी बांबूच्या मदतीने त्याला तेथून खाली उतरविल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला.

बापट कॅम्प परिसरातील अतिउच्चदाब उपकेंद्रातून निघणाऱ्या ३३ केव्ही शाहुमिल वाहिनीद्वारे मे. मेनन अँड मेनन कंपनीला वीज पुरवठा केला जातो. आज या वाहिनीवर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बिघाड झाल्याने मेनन कंपनीचा वीज पुरवठा बंद झाला. महावितरणच्या मार्केट यार्ड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र महाद्वार, शाखा अभियंता सचिन गंगापुरे यांनी जनमित्र संतोष यादव, बाबासाहेब मुल्ला, विकास सूर्यवंशी, स्वप्नील जाधव व चंद्रशेखर परतके यांच्या मदतीने बिघाड शोधण्याचे काम सुरू केले.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने कत्तलखाना भागाचा परिसर पुराने वेढला आहे. त्यामुळे भर पावसात पुरात जाऊन बिघाड शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. तसेच ते काम आव्हानात्मकही होते. अग्निशमन विभागाने याकामी आपत्ती व्यवस्थापनाची बोट दिली. या बोटीतून काही खांब तपासले असता एका खांबावर साप लटकून दोन तारांमध्ये अडकल्याचे दिसून आले. सापामुळे वीज वाहिनी वारंवार ट्रीप होत होती. शेवटी एका लाकडी बांबूच्या मदतीने मेलेला साप काढून टाकला तेव्हा कुठे वीज पुरवठा सुरळीत झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com