आमदार गोरेंना हद्दपारीचा प्रभाकर देशमुख समर्थकांचा एल्गार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

लाव रे तो व्हिडीओ...
​आमदार  गोरे यांनी आपल्या जीन्समध्ये टिच्चून काँग्रेस भरली आहे. तसेच कापले तरी पक्ष सोडणार नाही असे एका भाषणात जाहीर केले होते. ती व्हिडीओ क्लिप डॉ. येळगावकर यांनी लाव रे तो व्हिडीओ ... असे राज ठाकरे यांच्या स्टाईलने सांगत ती व्हिडीओ क्लिप उपस्थितांना ऐकविली. 

वडूज : हुतात्म्यांच्या त्यागाला आणि या खटाव माण तालुक्यांच्या नावलौकीकाला काळीमा फासणाऱ्या माजी आमदार जयकुमार गोरे यांना या विधानसभा निवडणूकीत घरी बसवित त्यांच्या हद्दपारीचा निर्धार अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या समर्थक नेतेमंडळींनी व कार्यकर्त्यांनी येथे झालेल्या सभेत केला.

शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसातही झालेल्या या सभेत देशमुख यांनी केलेले जोरदार शक्तीप्रदर्शन व नेतेमंडळींनी भाषणातून  अपक्ष उमेदवार श्री. देशमुख यांना पैजा लावत ऐतिहासिक मताधिक्क्यांनी विजयी करण्याचा निर्धार केला.   खटाव माण सर्वपक्षीय विकास आघाडी व आमचं ठरलंय चे अपक्ष उमेदवार प्रभाकर  देशमुख यांच्या निवडणूक प्रचारार्थ येथील बाजार चौकात विराट सभा झाली. यासभेला उपस्थितांची उपस्थितांची मोठी गर्दी होती. व्यासपीठावर श्री. देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दादासाहेब गोडसे, रणजितसिंह देशमुख, अनिलभाऊ देसाई, सुरेंद्रदादा गुदगे, संदिप मांडवे, डॉ. संदिप पोळ, एम.के. भोसले, प्रा. बंडा गोडसे, अशोकराव गोडसे, अनिल पवार, हिंदुराव गोडसे, मामूशेठ विरकर, डॉ. महेश गुरव, दिलीप तुपे, विजय शिंदे, डॉ. संतोष गोडसे, रविंद्र सानप, सुनिल पोळ, सुनिल गोडसे,  तानाजी देशमुख,  डॉ. राजश्री देशमुख, श्रीमती शशिकला देशमुख,नकुसा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी श्री. देशमुख यांनी शहरातून पदयात्रा काढली. पदयात्रेतील असणारी मोठी गर्दी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. त्यानंतर बाजार पटांगणात जाहीर सभा झाली. पदयात्रा बाजार पटांगणात पोहोचताच काही वेळात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. धो धो कोसळणाऱ्या पावसातही  हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना डॉ. येळगावकर म्हणाले, उरमोडी, जिहे कठापूरचे पाणी येण्यासाठी आपणासह माजी आमदार कै. भाऊसाहेब गुदगे, आजी माजी सैनिक संघटना, निवृत्त अभियंता संघटना यांचे मोठे योगदान आहे. असे असताना आमदार गोरे आपण एकमेव या पाणी योजनेचे भगिरथ आहे अशी वल्गना करून एकाच पाण्याचे पन्नासवेळा पूजन करून लोकांना फसवित आहेत. आमच्यावर चिखलफेक करणाऱ्या खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना निवडणूकीच्या निकालानंतर दूध का दूध और पाणी का पाणी समजेल. खटाव ही हुतात्म्यांची भूमी आहे, खटाव माण तालुक्याने अनेक चांगले लोकप्रतिनिधी दिले. या सर्वांच्या नावाला या माणसाने काळीमा फासण्याचेच काम केले आहे त्यामुळे  जनतेनेच  निवडणूक हातात घेतली आहे, जनतेनेच विरोधकांना घालवायचं ठरवलंय. प्रभाकर देशमुख यांना विधानसभेत पाठविण्यासाठी खटाव तालुक्यातील सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते, जनता एकत्र आली असून ७५ हजारांचे मताधिक्क्य देण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्नशिल आहोत. माण तालुक्यांतील नेते मंडळीनींही मोठे मताधिक्क्य द्यावे.  

प्रभाकर घार्गे म्हणाले, माण मतदार संघात विखाराचे राजकारण संपवून विचारांचे राजकारण आणण्यासाठी आम्ही सर्व मातब्बरांनी जाणीवपूर्वक प्रभाकर देशमुखांना समर्थन दिले आहे. सर्व विरोधक एकवटल्याने आ. गोरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते बेभान होऊन बेताल वक्तव्ये करीत आहेत. अशा कृत्यांमुळे त्यांचा पराभव अटळ आहे.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, आम्ही खानदानी शेतकरी आहोत. संघर्षाच्या राजकारणाचे बाळकडू आम्हाला जन्मजातच मिळाले आहे. गोरे बंधूंचे सगळे काळे धंदे आम्हाला माहिती आहेत. अवैध धंदे, लांडी-लबाडीतून सुरूवात झालेल्या गोरे बंधूंनी आमची मापे काढू नयेत त्यांनी स्वत:ची लायकी किती ते पहावे. खटाव माणच्या भूमिला चिकटलेले हा कुप्रवृत्तीचे बांडगूळ काढण्याची वेळ आली आहे.

अनिल देसाई म्हणाले, गुन्हेगारीकडे तरूणांना घेऊन जाणारी, व्याभीचारी वृत्ती जोपासणारी वाईट प्रवृत्ती या मतदार संघात आली आहे. या दृष्ट प्रवृत्तीला कायमचे घरी बसविण्यासाठी खटाव माण मधील सर्व नेतेमंडळींसह जनता एकत्र आली आहे.  मीच प्रभाकर देशमुख समजून प्रत्येकाने ही परिवर्तनाची लढाई ऐतिहासिक घडविण्यासाठी एका ताकदीने काम करावे.

डॉ. संदिप पोळ यांनी खटाव माणमध्ये निर्माण झालेली वाईट प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी जनतेनेच उठाव करून ही निवडणूक हातात घेऊन प्रभाकर देशमुख यांच्या पाठीशी ताकद उभी केली असल्याचे सांगितले. मामूशेठ विरकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे खटाव माण  तालुक्यांतील सर्व कार्यकर्ते, समाजबांधव प्रभाकर देशमुख यांच्या विजयासाठी प्रयत्नशिल असल्याची ग्वाही दिली.

प्रभाकर देशमुख यांनी आपल्या भाषणात दोन्ही तालुक्यांचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याबरोबरच औद्योगिकरण, बेरोजगारांना रोजगार, माता भगिनींचा सन्मान राखण्यासाठी  व सार्वजनिक शांतता हे प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपणास संधी देण्याचे आवाहन केले. येथील सभेत तालुक्यातील बहुतांशी अभियंत्यांनी एकत्र येऊन विधायक नेतृत्व असणाऱ्या प्रभाकर देशमुख यांना जाहीर पाठींबा दिला. तर राष्ट्रवादी पदवीधर जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष प्रा. तुषार सावंत यांनी पत्रकाद्वारे देशमुख यांना पाठींबा दिला.

यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. पृथ्वीराज गोडसे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सुत्रसंचालन केले. माजी सभापती संदिप मांडवे यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक अभय देशमुख, विपूल गोडसे, सचिन माळी, राजेंद्र चव्हाण, विश्वास तुपे, नाना पुजारी, तानाजी बागल, प्रा. एस.पी.देशमुख, डॉ. प्रकाश पाटोळे, सागर पवार, विजय काळे, टी.के.देवकर, अक्षय थोरवे आदीसह शेकडो मान्यवर उपस्थित होते.

लाव रे तो व्हिडीओ...
आमदार  गोरे यांनी आपल्या जीन्समध्ये टिच्चून काँग्रेस भरली आहे. तसेच कापले तरी पक्ष सोडणार नाही असे एका भाषणात जाहीर केले होते. ती व्हिडीओ क्लिप डॉ. येळगावकर यांनी लाव रे तो व्हिडीओ ... असे राज ठाकरे यांच्या स्टाईलने सांगत ती व्हिडीओ क्लिप उपस्थितांना ऐकविली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prabhakar Deshmukh campaign in Waduj