पुरग्रस्त 'ब्रम्हनाळ' गाव प्रकाश आंबेडकरांनी घेतले दत्तक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसले असताना गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यावेळी बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

मुंबई : सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील ब्रम्हऩाळ हे पुरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले आहे. गावचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आंबेडकर यांनी घेतली आहे.

ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसले असताना गावकऱ्यांकडून बचावकार्य सुरु होते. यावेळी बोट पाण्यात उलटुन 14 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. 3 हजार 500 लोकसंख्या असलेले हे गाव वंचित बहुजन आघाडीने दत्तक घेतल्याचे कळताच गावचे सरपंच व गावकऱ्यांनी समाधानी व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीने पत्र देऊन आम्ही पुनर्वसनासाठी आमचे गाव उपलब्ध करून देत आहोत, असे जाहीर केले आहे.

पुनर्वसनांतर्गत गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषध उपचार केले जातील. तसेच 700 कुटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढी राशन धान्याची व्यवस्था केली जाईल. गावातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य दिले जाईल. गावात स्वच्छ पाण्याची कायमस्वरुपी सोय व्हावी म्हणून वॉटर एटीएम लावण्यात येईल. गावकऱ्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानस उपचार व वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातील. त्याचप्रमाणे गावकऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar adopted Bramhanal village