'प्रकाश आंबेडकरांकडून राजकारणासाठी बाबासाहेबांच्या नावाचा वापर'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

निवडणुकीसाठी केलेली ही वंचित आघाडी म्हणजे या घटकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी केला.

सांगली : प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला. मी बाबासाहेबांचा वारसदार असे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. मात्र वंचितांचा, शोषितांचा वापर त्यांनी निवडणुकीपुरता करु नये. निवडणुकीसाठी केलेली ही वंचित आघाडी म्हणजे या घटकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी केला.

 

राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले मधुकर कांबळे यांनी आज सांगलीत
पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांवर टीकेचे आसूड ओढले. प्रकाश
आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर वंचित बहुजन आघाडी
स्थापन केली आहे. याबाबत बोलताना कांबळे म्हणाले, "बाबासाहेब
आंबेडकरांचे वारस असताना त्यांना वंचितांसाठी काम करण्याचा अधिकार होता.

त्यांच्याकडून राज्याला, देशाला फार मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र
त्यांनी काही केले नाही. त्यांनी केवळ नावाने नाही तर कर्माने
बाबासाहेबांचे वारसदार व्हावे. समोर निवडणूक असल्यामुळे वंचितांना
आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यांनी हा विषय केवळ
निवडणुकीपुरता घेऊ नये. वंचित आघाडी स्थापन करण्याचा हा प्रयत्न
वंचितांची दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे हे समाज घटक त्यांना बळी पडणार नाहीत. जे जे समाज घटक त्यांच्या सोबत जातात त्यांचा भ्रमनिरास होतो आणि हे लोक काही काळानंतर त्यांच्यापासून दूर जातात. मखराम पवार, भांडे यांच्यासारखे अनेकजण त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने आले, पण नंतर दूर गेले.'

सामाजिक न्याय आणि समता हा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याचा कार्यक्रम आहे. सरकारने हे काम हाती घेतले आहे. त्यामुळे पहिल्यांदा या राज्यात समतेचे राज्य येण्यास सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे वारसदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मधुकर कांबळे आहेत. प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असा टोलाही कांबळे यांनी प्रकाश आंबेडकरांना हाणला.

Web Title: Prakash Amedkar Uses Babasaheb Ambedkar s Name for Politics allegation by Madhukar Kambale