प्रकाश आवाडे - पी. एन. यांचे मनोमिलन!

प्रकाश आवाडे - पी. एन. यांचे मनोमिलन!

इचलकरंजी - काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांची भेट घेतली. आगामी काळात काँग्रेस पक्ष मजबुतीकरणासह लोकसभा- विधानसभा निवडणूक व पुढील वाटचाल या संदर्भात त्यांच्याशी श्री. आवाडे यांनी सविस्तर चर्चा केली. बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर प्रकाश आवाडे व पी. एन. पाटील यांच्या भेटीकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राचे विशेष लक्ष होते. जिल्हाध्यक्ष बदलीनंतर पी. एन. पाटील हे नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू होती; पण नूतन अध्यक्ष प्रकाश आवाडे व पी. एन. पाटील यांच्या भेटीने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  

मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये एकसंघपणे काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबरोबरच गत दहा वर्षांत काँग्रेसमध्ये जे घडले ते विसरून एकदिलाने पुन्हा एकदा काम करण्याचा निर्णय उभयंतांच्या या भेटीत घेण्यात आला. जि.प. सदस्य राहुल आवाडे, राहुल पाटील उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मिळाले बळ

कोल्हापूर - काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याशी फटकून वागणारे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील यांनी बुधवारी आवाडे यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांतील संभ्रमावस्था संपवली. 
दोघांच्या भेटीने कार्यकर्त्यांत वेगळा संदेश जाईल.

जिल्हाध्यक्षपदी निवडीनंतर आवाडे यांनी पी. एन. यांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली, त्याच पद्धतीने पी. एन. यांनीही त्यांच्या कार्याला शुभेच्छा देताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू, असे जाहीर केले. 

प्रत्यक्षात आवाडे यांच्या निवडीनंतर कार्यभार द्यायलाही पी. एन. उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर काँग्रेस कमिटीत 
आवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली, एक मेळावा घेतला. त्याकडे पी. एन. यांनी पाठ फिरवली. यातून कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दोन प्रमुख नेत्यांतील विसंवादामुळे कार्यकर्त्यांतही अस्वस्थता होती. या पार्श्‍वभूमीवर आवाडे यांनी पी. एन. पाटील व त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांची भेट घेऊन संभ्रमावस्था संपुष्टात आणली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com