विश्‍वासदर्शक ठरावात कोल्हापूरचे अपक्ष आमदार कोणाच्या बाजूने राहीले ?

Prakash Awade  With BJP Yadravkar With Shiv sena In Assembly
Prakash Awade With BJP Yadravkar With Shiv sena In Assembly

कोल्हापूर -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने आज विधानसभेत विश्‍वासदर्शक ठराव जिंकला पण त्याचवेळी जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदार व जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. विनय कोरे हे यात कोणाला मतदान केले याविषयी उत्सुकता होती. तथापि कोरे हे आज विधानसभेत गैरहजरच राहीले तर इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला साथ दिली. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यापुर्वीच शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ते विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने राहिले. 

दिलीप वळसे - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहूमत चाचणी घेण्यात आली. कामकाजाच्या सुरूवातीलाच भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासह आजच्या विशेष अधिवेशनावरच आक्षेप नोंदवले. पण हंगामी विधानसभा अध्यक्ष वळसे - पाटील यांनी हे सर्व आक्षेप फेटाळून लावल्याने भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला. त्यात आवाडे यांचाही समावेश होता. भाजप आमदारांसोबत आवाडे हेही सभागृहातून निघून गेले. 

आमदार कोरे होते कोठे ?

'जनसुराज्य' चे सर्वेसर्वा हे गेल्या काही दिवसांपासून भाजपसोबत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीतही भाजप बंडखोरांना त्यांनी उमेदवारी दिल्याचा आरोप होता. आजच्या विश्‍वासदर्शक ठरावाला मात्र ते गैरहजर राहीले. राज्यात भाजपचे सरकार येत नाही असे लक्षात आल्यापासून त्यांचा कल हा शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीसोबतच होता. आज ते वारणानगर येथेच थांबून होते. उद्यापासून वारणा कारखान्याचा हंगाम सुरू होत असल्याने त्याच्या तयारीसाठी ते वारणेत थांबून असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. 

राजेंद्र पाटील-यड्रावकर मात्र महाविकास आघाडी सोबत

राष्ट्रवादीतून बाहेर पडत अपक्ष म्हणून शिरोळ विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. विश्‍वासदर्शक ठरावावेळी ते सभागृहातच थांबून होते. याशिवाय कॉंग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव या चार आणि आमदार हसन मुश्रीफ व राजेश पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनीही विश्‍वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले. 

कोरे आघाडीसोबत जाण्याची शक्‍यता

लोकसभेपासून भाजपसोबत असलेले डॉ. विनय कोरे हे बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीसोबत जाण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत मैत्री आहे, त्यातून त्यांनी महाविकास आघाडीशी संपर्क साधल्याची चर्चा होती. आज विश्‍वासदर्शक ठरावाला त्यांनी लावलेली गैरहजेरी हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com