माझ्या गँगमध्ये सामील का होत नाहीस? रागातून मित्रानंच काढला मित्राचा काटा, गुंड पुजारीचा खून I Sangli Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Islapur Police Prakash Pujari

आरोपींच्या शोधासाठी परिसरात पथके रवाना झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Sangli Crime : माझ्या गँगमध्ये सामील का होत नाहीस? रागातून मित्रानंच काढला मित्राचा काटा, गुंड पुजारीचा खून

इस्लामपूर (सांगली) : माझ्या गँगमध्ये सहभागी का होत नाहीस असं म्हणत शहरातील सराईत गुंड प्रकाश महादेव पुजारी (वय २४) याचा मंगळवारी मध्यरात्री डोक्यात धारधार शस्त्राने वार करून त्याच्या मित्रांनीच खून केला. या प्रकारानंतर एकच खळबळ माजली आहे.

नवीन बहे नाका परिसरातील चौकात मल्हार बार समोर हा प्रकार घडला. खुनानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं आहे. मृत प्रकाशचे (Prakash Mahadev Pujari) गुन्हेगारी क्षेत्रातील सहकारी गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार यांनी चॉपर व दगड विटांनी हल्ला चढवला.

प्रकाश पुजारी हा संशयित गजराज पाटील व त्याचे साथीदार हे त्याचे गँगमध्ये सामिल होत नाही म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाशवर खुन्नस ठेवून होते. या कारणाचा राग मनात धरून त्यांच्यात सतत धुसफूस होत होती. काल रात्री प्रकाश त्याच्या मित्रांच्यासोबत बारमध्ये दारू पीत बसला होता. तेथे येवून गजराज पाटील याने प्रकाश बरोबर वाद केला. त्यानंतर गजराजने प्रकाशच्या डोक्यावर हल्ला चढवला.

तर सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी साथीदार यांनी मिळून लाथाबुक्यानी आणि दगड व विटाने मारहाण करून त्याचा खून केला. याबाबतची फिर्याद रोहन रविंद्र इच्चुर याने इस्लामपूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

गजराज पाटील, सागर ऊर्फ चकल्या म्हस्के, अकीब पटेल व त्यांचा अनोळखी एक साथीदार या चार जणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री इस्लापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी परिसरात पथके रवाना झाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :SangliCrime NewsIslampur