श्रवणदोषावर मात करत ती होणार डॉक्‍टर !

श्रवणदोषावर मात करत ती होणार डॉक्‍टर !

कोल्हापूर - तिचं नाव प्रणिता. निसर्गाच्या विचित्र फटकाऱ्यात तिला श्रवणदोष जडला. त्यावर मात करीत तिने शैक्षणिक करिअर उज्ज्वल केले; पण पुन्हा व्यवस्थेचे अडथळे उभे राहिले. त्यावरही सुदैवाने मात करता आली आणि आता ती डॉक्‍टर होणार आहे. बधिरतेकडून वक्‍तृत्वापर्यंत आणि वक्‍तृत्वापासून डॉक्‍टर होण्यासाठी सज्ज असा तिचा प्रवास इतरांना जिद्दीचा नवा धडा देणारा ठरतो आहे. 

प्रणिता पाटील कोडोली (ता. पन्हाळा) येथे राहते. तिचा श्रवणदोष शंभर टक्के बराच झाला नाही. ज्याची श्रवणशक्ती कमकुवत होते, त्याचं बोलणंही खुंटतं. मूकबधिरता वाट्याला येते; पण तिच्या पालकांनी जिद्द सोडली नाही. तिच्या उपचारासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. उपचारातून थोडाबहुत श्रवणदोष दूर झाला. त्याच आधारावर पालकांनी तिला शिक्षण देत तिचा वाचाविकास घडवला. ती बोलू लागली आणि पुढे प्रत्येक इयत्तेत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

तिने दहावीमध्ये ९४ टक्के गुण मिळवले. फक्‍त एवढ्यावरच ती थांबली नाही, तर डॉक्‍टर होण्याचे स्वप्न बाळगले. एमबीबीएसला ॲडमिशन घेण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. त्या परिश्रमाचे फलित म्हणून ‘नीट’ परीक्षाही उत्तीर्ण झाली; मात्र तिच्यातील श्रवणदोषामुळे महाविद्यालयाने प्रवेश नाकारला. येथे कायदा तिच्या मदतीला धावला आणि तिला मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज (सायन) येथे प्रवेश मिळाला. 

प्रणिताचे वडील व्यावसायिक. आई शिक्षिका. प्रणिता एकुलती एक. ती चार वर्षांची असताना पालकांच्या लक्षात आले, की ती बोलू शकत नाही. त्यांनी कोल्हापुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष कुलकर्णी यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी ती ऐकू शकत नसल्याचे सांगितले आणि तेथूनच तिचा जिद्दीचा प्रवास सुरू झाला. डॉ. पुष्पांजली गुरवळ यांच्याकडे तिचे पुढील उपचार सुरू झाले. श्रवणयंत्र लावल्यानंतर तिला ऐकू येऊ लागले. तिला मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेत न पाठवता आईवडिलांनी सर्वसामान्य मुलांच्या शाळेत घातले. तिने गुणवत्तेच्या जोरावर प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक मिळवला.

सातवीनंतर सीबीएससी पॅटर्नच्या अभ्यासक्रमात ॲडमिशन घेतले व तेथेही आपली गुणवत्ता सिद्ध केली. शिक्षणासोबत ती विविध कलाकुसरीच्या वस्तूही करायला शिकली. कोडोलीतील कोडोली हायस्कूल व भाई शंकर तुकाराम पाटील (आप्पा) ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीला ॲडमिशन घेतले. नीटच्या तयारीसाठी अधिक लक्ष देताना तिने अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. तिचा हा सारा प्रवास अनेकांना बळ देणारा आहे.

मला ऐकू येत नव्हते. परिणामी बोलताही येत नव्हते. मात्र आई-बाबांनी जिद्द सोडली नाही. एमबीबीएस प्रवेशासाठी आई-बाबांनी प्रयत्न केले आणि माझे ध्येय दृष्टीक्षेपात आले.
- प्रणिता पाटील,
कोडोली, ता. पन्हाळा

ती चार वर्षांची असताना मूकबधिर असल्याचे लक्षात आले. तिला सर्वसामान्य मुलीप्रमाणेच शिक्षण द्यायचे, असे आम्ही ठरवले. कोणतेही संकट आले, तरीही जिद्द सोडली नाही. तिनेही गुणवत्ता सिद्ध केली आणि सर्वच पातळ्यांवर यशस्वी झाली. आता तिला एमबीबीएससाठी ॲडमिशन मिळाले आहे. पुढील पाच वर्षांत ती डॉक्‍टर होईल. 
- प्रदीप पाटील व सुनीता पाटील,
प्रणिताचे पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com