परिचारकांच्या बेताल वक्तव्याप्रकरणी पंढरपूर बंद

अभय जोशी 
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सोशल मिडियाच्या माध्यमातून आजच्या पंढरपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, माजी सैनिक संघटना यासह विविध संघटनांनी आजच्या बंदला पाठींबा दिला होता.

पंढरपूर - आमदार प्रशांत परिचारकांनी सैनिकांच्या कुटुंबियांच्या संदर्भात केलेल्या बेताल व अक्षम्य वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आयोजित पंढरपूर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. 

सोशल मिडियाच्या माध्यमातून आजच्या पंढरपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, माजी सैनिक संघटना यासह विविध संघटनांनी आजच्या बंदला पाठींबा दिला होता. त्यामुळे सकाळपासून श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर, नवीपेठ, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग आदी प्रमुख भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. सकाळी अकराच्या सुमारास शिवाजी चौकात माजी नगसेवक नामदेव भुईटे, संभाजी ब्रिगेडेचे किरण घाडगे, शहराध्यक्ष स्वागत कदम,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष दिपक वाडदेकर, संदीप मांडवे यांच्यासह माजी सैनिक, महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. तिथे परिचारक यांच्या वक्तव्याचा निषेध करुन त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा आदी मागण्या करणारी अनेकांची भाषणे झाली. त्यानंतर मोर्चाला प्रारंभ झाला. 

स्टेशन रोड, सावरकर पुतळा, बस स्थानक, अर्बन बॅंक, भादुले पुतळा, नाथ चौक मार्गे पुन्हा मोर्चा शिवाजी चौकात आला. तिथे तहसिलदार अनिल कारंडे हे निवेदन स्विकारण्यासाठी आले होते. त्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चातील काही जणांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहायक पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी कायदेशीर बाबींची तपासणी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. दरम्यान आजच्या बंद च्या पार्श्‍वभूमीवर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. 

Web Title: Prashant Paricharak controversial statement Pandharpur Bandh