झाडांच्या प्रेमापोटी झपाटलेला प्रतीक बावडेकरची निसर्ग कथा

सुधाकर काशीद
मंगळवार, 5 जून 2018

फक्‍त एक फोन करायचा. ठिकाण सांगायचे. झाडाचे एक रोप, कुदळ, फावडे, बुट्टी घेऊन तो हजर. मग तो खड्डा काढतो. तेथे तुमच्या हस्ते झाड लावतो. जाताना झाड जगवण्यासाठी आवश्‍यक त्या सूचना देतो. एवढेच नव्हे, तर तुम्ही ते झाड जगवलंय की नाही, याचा दोन महिने काटेकोर पाठपुरावा करतो. अशा पद्धतीने त्याने आजअखेर 999 झाडे लावली आहेत. 

कोल्हापूर : फक्‍त एक फोन करायचा. ठिकाण सांगायचे. झाडाचे एक रोप, कुदळ, फावडे, बुट्टी घेऊन तो हजर. मग तो खड्डा काढतो. तेथे तुमच्या हस्ते झाड लावतो. जाताना झाड जगवण्यासाठी आवश्‍यक त्या सूचना देतो. एवढेच नव्हे, तर तुम्ही ते झाड जगवलंय की नाही, याचा दोन महिने काटेकोर पाठपुरावा करतो. अशा पद्धतीने त्याने आजअखेर 999 झाडे लावली आहेत. 
झाड लावणे सोपे आहे; पण ती सर्व झाडे त्याने जगवली आहेत. उद्या तो पर्यावरण दिन आणि त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक हजारावे झाड लावणार आहे. जणू तो झाडांच्या या प्रेमापोटी झपाटलेलाच आहे. त्याच्या मित्रांनी तर त्याला झपाटलेलं झाडच ठरवले आहे. 

प्रतीक बावडेकर या ध्येयवेड्या तरुणाची ही हिरवीगार टवटवीत कथा आहे. तो एका सराफाचा मुलगा. त्याचा बंगला ऐसपैस. म्हटलं तर तो बंगल्याच्या आवारात पन्नास झाडे लावून निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. पण, त्याने ठरवले, आपण जमेल तेथे झाड लावायचे व जगवायचे. त्यासाठी त्याने सुरुवातीला मित्र परिवार, नातेवाइकांचा आधार घेतला. त्याने 14 मे 2016 रोजी फेसबुक, व्हॉटस्‌ऍपवर तुम्ही मला फक्‍त एक फोन करा, असे आवाहन केले. ज्यांचे ज्यांचे फोन आले, त्यांना प्रतीक याने मी तुमच्या जागेत माझ्या खर्चाने, माझ्या श्रमाने झाड लावू इच्छितो, असे सांगितले. बहुतेकांनी त्याची विनंती मान्य केली. बघता बघता पहिल्या महिनाभरात पन्नास झाडे लावली. ही संख्या दोन वर्षांत 999 वर पोहोचली. 
 

Web Title: Pratik Bavdekar, Planting plants