Loksabha 2019: प्रतीक पाटील यांचे सोनियांकडे गाऱ्हाणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

सांगली - येथील लोकसभा मतदारसंघाची जागा हातून सटकत असल्याने अस्वस्थ झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिल्लीत जाऊन नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले.

सांगली - येथील लोकसभा मतदारसंघाची जागा हातून सटकत असल्याने अस्वस्थ झालेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दिल्लीत जाऊन नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. प्रदेश काँग्रेसकडून कारण नसताना सांगली मतदारसंघावर अन्याय केला जात आहे. २०१४ पर्यंत अपराजित असलेला हा मतदारसंघ वाऱ्यावर का सोडताय, अशी विचारणा त्यांनी श्रीमती गांधी यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे. 

सांगली मतदारसंघातून विशाल पाटील लढायला तयार आहेत, आम्ही एकमताने त्यांचे नाव सुचवले आहे. त्यांनी नकारही दिलेला नाही; मात्र ही जागा अन्य पक्षाला देण्याचा डाव खेळला जातोय. तसे झाल्यास आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा गंभीर इशारा प्रतीक यांनी दिला आहे.

‘सकाळ’शी भ्रमणध्वनीवरून बोलताना ते म्हणाले, ‘‘मी, विश्‍वजित, जयश्रीवहिनी आणि विशाल यांनी एकत्र बैठकीत विशालचे नाव पुढे केले आहे. काँग्रेसच्या हितासाठी मी दोन पावले मागे सरकण्याचा निर्णय घेतला. विशालला चाल दिली, विधानसभेसाठी जयश्रीवहिनींनी लढावे, अशीही भूमिका घेतली. सारे व्यवस्थित सुरू होते; पण आताच काय माशी शिंकली? काँग्रेसने सांगलीची जागा अद्याप सोडली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत प्रदेश पातळीवरून चर्चा सुरू असली तरी तो निर्णय होणार नाही, याची मला खात्री आहे. सांगली, नंदुरबार हे काँग्रेसचे बालेकिल्ले राहिले आहेत. गेल्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून जागा सोडावी, अशी वेळ आलेली नाही.’’

ते म्हणाले, ‘‘दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे मी माझी स्पष्ट भूमिका आणि सांगलीची स्थिती सांगितली आहे. त्यावर गंभीरपणे विचार सुरू झाला आहे. मला खात्री आहे, सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचाच राहील. पक्षाची उद्या बैठक होत आहे. त्यात निर्णय जाहीर होईल.’’  

लहान समजून डावलू नका
प्रतीक पाटील म्हणाले, ‘‘पतंगराव कदम, आर. आर. आबा, मदनभाऊ आता नाहीत म्हणून आमच्याशी काहीही खेळ मांडला जावा, इतके हलक्‍यात घेऊ नये; अन्यथा आम्हालाही आमची ताकद दाखवावी लागेल. आम्हाला लहान समजून डावलू नका, अशी स्पष्ट भूमिका मी मांडली आहे.’’

Web Title: Pratik Patil meet Soniya Gandhi in Delhi