पुलंचे साहित्य आनंदाची ऊर्जा देणारे - प्रा. दवणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

कोल्हापूर - ‘‘ तुमच्या एका हातात फोडणी भाताची प्लेट आणि दुसऱ्या हातात पुलंचे कोणतेही पुस्तक असेल तर एक घास तुमचे पोषण करेल तर दुसरा घास ज्ञानाचे पालन करेल, त्यासाठी भाषेचा आनंद घेण्याची भूक पोटात सतत जागृत ठेवा. पुलंचा एकेक शब्द, एकेक कोट्या अलगत वेचत रहा, तुमच्या जगण्याला आनंदाची ऊर्जा पुलंचे साहित्य नक्की देईल.’’ असा विश्‍वास प्रसिध्द कवी प्रा. प्रवीण दवणे यांनी आज येथे व्यक्त केला. 

येथील महापालिकेतर्फे सुरू असलेल्या राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमालेत ‘मला उमजलेले पु.ल.’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमहापौर भूपाल शेटे अध्यक्षस्थानी होते. 

दवणे म्हणाले की, ‘‘ नव्याकाळात अनेक समस्यांनी घेरलेली व्यक्ती एकाही क्षेत्रात धड वावरू शकत नाही, पण पु. ल. देशपांडे पटकथा, कथालेखक होते. ते संगीतकार, गायक, वादक, अभिनय, नाटक, एकांिकका अशा अनेक प्रकारांत लीलया वावरले. त्यांच्या साहित्याने फक्त महाराष्ट्राला नव्हे तर जगभरात जिथे जिथे मराठी आहे तिथे तिथे मोहिनी घातली. ते लेखक म्हणून जसे निपुण होते. तसा त्यांच्या दातृत्वाचा भावही समृध्द होता. त्यांनी लेखन, साहित्यातून जितके कमावले ते-ते सगळं समाजसेवेसाठी त्यांनी भरभरून दिले.’’

प्रा. दवणे म्हणाले की, ‘‘पुलंच्या साहित्याने जग पाहायला शिकवले, म्हणून त्यांच्या प्रवास वर्णनांची सुहासवर्णने झाली आहेत.  त्यांच्या साहित्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा उपेक्षितांच्या व्यक्तिरेखा होत्या. त्या व्यक्तिरेखा हसविता हसविता अंतर्मुखही करतात,  म्हणून अंतूबर्वा, नारायण, चितळे मास्तर अशा व्यक्तिरेखा अनेक वाचकांच्या मनात घट्ट आहेत. अशा सर्व 

व्यक्तिरेखा भेटल्या तर काय कराल असे पुलंना विचारले असता ते म्हणाले होते, की या व्यक्तींना कडकडून आपुलकीची मिठी मारेन. यातून दुसऱ्यांचे कौतुक करण्याचा पुलंचा भाव जाणवतो, ते कौतूक करताना हात सैल सोडत.’’

सध्या जीवनातील आनंदाचा भाव हरवून जातोय, माणसांचं यंत्र होत जात आहे. अशा काळात भाषेतील गोडवा, विनोदातील आनंद समजून घ्यायचा असेल तर प्रत्येकाने पुलं वाचले पाहिजेत. नव्या पिढीला शिक्षकांनी पुलं समजून दिले पाहिजेत, तरच मातृभाषेतील मायेचा ओलावा व भाषेचा गोडवा अधिक समृध्द होईल. असेही प्रा. दवणे यांनी सांगितले.  

Web Title: Pravin Davane comment