कोल्हापूर हे आपत्ती व्यवस्थापनाचं विद्यापीठ : प्रवीण तरडे

कोल्हापूर हे आपत्ती व्यवस्थापनाचं विद्यापीठ : प्रवीण तरडे

कोल्हापूर - महापुरानं वेढलं असताना कोल्हापूरकरांनी कोल्हापूरकरांसाठी राबवलेली आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणाही एक आदर्श मॉडेल ठरली. कोल्हापूर म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचंही विद्यापीठ असल्याचेच हे एक प्रतीक असल्याचे गौरवोद्‌गार आज प्रसिध्द अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी काढले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषदेसह राज्यभरातील विविध कलाकार व तंत्रज्ञ संघटनांच्या पुढाकाराने आज पूरग्रस्तांसाठी सोळा ट्रक जीवनावश्‍यक साहित्य आणि पशुखाद्याची मदत सुपूर्द केली. कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपचे उज्वल नागेशकर यांच्याकडेही मदत दिली. 

दरम्यान, महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रवीण तरडे यांच्यासह अभिनेता संतोष जुवेकर यांच्यासह कलाकार मंडळी गहिवरून गेली. एरवी आम्ही सारी मराठी सिनेसृष्टी आनंद सोहळ्यांच्या निमित्ताने एकवटतो. मात्र, पहिल्यांदाच आपत्तीच्या काळात मदतीसाठी सारी सिनेसृष्टी एकवटली. ज्या कोल्हापूर, सांगलीने मराठी सिनेमा, नाटकांना नेहमीच बळ दिलं. तिथल्या शेतकऱ्यांच्या आणि जनावरांच्या महापुरातील व्यथा साऱ्यांचेच काळीज चिरणाऱ्या होत्या, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. 

प्रवीण तरडे म्हणाले, ""रणरागिणी ताराराणींच्या या भूमीनं आपत्ती व्यवस्थापनातील शिस्तही उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिली आहे. हीच शिस्त, कोल्हापूरकरांची जिद्द पुढे रस्त्यावरच्या वाहतूकीपासून ते अगदी रोजच्या जगण्यात येत जाईल. आम्ही काही प्रातिनिधीक कलाकार येथे आलो असलो तरी गेली चार दिवस राज्यभरातील कलाकार व तंत्रज्ञ मंडळी जिथे असतील तिथे दिवस-रात्र पॅकेजिंगच्या कामात व्यस्त होते. अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी असो किंवा अगदी सई ताम्हणकर, प्रिया बापट, स्पृहा जोशी, पूजा पवार, सोनाली कुलकर्णी ही सारी मंडळींनी या कामात योगदान दिले आहे.'' 

अभिनेता संतोष जुवेकर यांनी "या जगात कुणी कुणासाठी नसते' ही प्रचलित म्हण कोल्हापूरकरांनी खोटी करून दाखवली असल्याचे सांगितले. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महामंडळ, नाट्य परिषदेच्या राज्यभरातील सभासदांनी या मोहिमेत सक्रीय योगदान दिल्याचे सांगितले. 
विनोद सातव, महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सतिश बिडकर, सतीश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अभिनेता स्वप्नील राजशेखर, भरत दैनी, संतोष शिंदे, संजय मोहिते, मिलिंद अष्टेकर, सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे आदींनी कोल्हापूरच्या वतीने राज्यभरातील सर्व कलाकार व तंत्रज्ञांचे आभार मानले. 

पूरग्रस्तांशी आज संवाद 
केवळ मदत सुपूर्द करून ही मंडळी गेली नाहीत. त्यानंतर महासैनिक दरबार हॉलमधील स्वयंसेवकांबरोबर पॅकिंगचे कामही केले. त्यांच्याबरोबर आलेले सुमारे शंभर जण आणखी काही दिवस पॅकिंगच्या कामात सहभागी होणार आहेत. उद्या (शनिवारी) कलाकार मंडळी आंबेवाडी, प्रयाग चिखली येथे जावून प्रत्यक्ष पूरग्रस्तांना मदत देणार आहेत आणि त्यांच्याशी संवादही साधणार आहेत. 

शिस्तबध्द काम 
राज्यभरातून मदत येत होती. मात्र, ती आहे तशी न पाठवता पॅकींग करण्यापूर्वी "केडीएम' ग्रुपच्या समन्वयकांशी संवाद साधून येथील पॅकींगची पध्दत माहिती करून घेतली आणि त्यानुसार सर्व साहित्य पॅक करून ते येथे आणले गेले. 

दीपाली सय्यद यांच्याकडूनही मदत 
अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातूनही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी पाच कोटींची मदत दिली जाणार आहे. उद्या (शनिवारी) त्या सांगलीत जाणार असून दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबातील एक हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी फाऊंडेशन घेणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com