पुराशी दोन हात करत जन्मले गोंडस बाळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

वारणानगर - कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधांअभावी वंचित राहावे लागत असतानाच केवळ डॉक्‍टरांनी महापुराशी दोन हात करीत गरोदर मातेला रुग्णालयात पोहोचविल्याने बाळाचा जन्म सुखरूप झाला. 

वारणानगर - कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधांअभावी वंचित राहावे लागत असतानाच केवळ डॉक्‍टरांनी महापुराशी दोन हात करीत गरोदर मातेला रुग्णालयात पोहोचविल्याने बाळाचा जन्म सुखरूप झाला. 

स्वप्नाली सागर नाईक (वय २४, रा. वाघवे, पन्हाळा) यांना कळा सुरू होत्या. मध्यरात्री डॉ. अभिजित जाधव यांना संपर्क करण्यात आला. ते त्वरित निघाले. पोर्ले-उतरे मार्गावरील ओढ्यावर गुढघाभर पाणी होते. रेस्क्‍यू टीमला बोलवावे, तर किमान चार तास लागणार. त्यामुळे वाहत्या पाण्यात गाडी घालण्यात आली. वाघवेत पोहोचून मातेला गाडीत घेण्यात आले.

कोल्हापूरच्या ग्रामीण रुग्णालयात जात असताना पुन्हा पाणी वाढले. पण, मातेची परिस्थिती पाहून पुन्हा गाडी पाण्यातून नेण्यात आली. दरम्यान, उचगावच्या उड्डाणपुलाच्या पुढे पाणी आले होते. इथेही पाण्यामधून वाट काढून मातेला रुग्णालयात सुखरूप पोहोचवण्यात यश मिळाले आणि बाळाचा जन्म झाला. यात बाळ, आई सुखरूप आहेत. पुराच्या पाण्यामधूनही मार्ग काढत मार्गक्रमण केल्याने प्रसूती सुखरूप झाली, अपसूकच नातेवाइकांनी निःश्‍वास सोडला अन्‌ धन्यवाद दिले. 

पूरग्रस्त भागामधील गरोदर माता आणि नातेवाइकांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. जेणेकरून त्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. पूरग्रस्त भागामध्ये शासनाने बोटींची व्यवस्था करावी.
- डॉ. अभिजित जाधव, 

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, कोल्हापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pregnant woman delivery in Kolhapur Flood situation