पंतप्रधानांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी अटापिटा 

Narendra Modi
Narendra Modi

सोलापूर : आरक्षणाच्या मुद्‌द्‌यावरुन धनगर व लिंगायत समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या सभेवर बहिष्कार टाकला आहे तर केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवावी ही मराठा समाजाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. दुसरीकडे उच्च न्यायालयाने आरक्षण देऊनही त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने केली नसल्याने मुस्लीम समाजही नाराज आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांच्या सभेला गर्दी व्हावी, याकरिता सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची झोप उडाल्याचे पहायला मिळत आहे. 

बेरोजगारी, सोलापूरच्या टेक्‍स्टाईल उद्योगाची बिघडलेली स्थिती, रखडलेली कर्जमाफी अन्‌ गडगडलेले शेतमालांचे दर आणि दुष्काळी मदतीची शेतकऱ्यांना असलेली प्रतीक्षा यासह अन्य कारणांमुळे सभेला गर्दी होण्याची शक्‍यता कमी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी नुसत्या पोलिस अथवा सिमेवरील जवानांचे कपडे सोलापुरातील उद्योजकांकडून शिवले असते तर त्यांना अच्छे दिन आले असते. त्याचा जोरदार फटका शिंदे यांना निवडणुकीत बसला आणि विजयाची खात्री नसलेले ऍड. शरद बनसोडे मोदी लाटेत खासदार झाले. आता त्याच मुद्‌द्‌यावर शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात करत अच्छे दिन, विकासाचे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींला लक्ष केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

मोदींना मी बोलाविले... 
लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांना मी बोलाविले, असे म्हणत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या आता श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेले खासदार अमर साबळे यांनीही आपल्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान सोलापुरला येणार असल्याचे सांगत आहेत. 

आडम मास्तरांमुळे होईल गर्दी 
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आयोध्येनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची 24 डिसेंबरला पंढरपुरात सभा झाली. त्यावेळी लाख-सव्वा लाख लोक उपस्थित होते. त्या सभेपेक्षाही मोठी सभा होण्याकरिता दोन्ही मंत्र्यांनी कंबर कसल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, सोलापुरातील रे नगर च्या 30 हजार घरकूल प्रकल्पाचे उद्‌घाटन यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सर्व लाभार्थ्यांना सभेला आणावे, अशी विनंती दोन्ही मंत्र्यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांना केल्याची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com