उद्धव ठाकरेंच्या सभेची पंढरपुरात जय्यत तयारी

अभय जोशी
शनिवार, 22 डिसेंबर 2018

ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी पंढरपुरात जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. अयोध्या नंतर प्रथमच महाराष्ट्रात ठाकरे सभा घेणार असल्याने ही ऐतिहासिक व्हावी यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
शरयू तीरावर जशी ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तशीच चंद्रभागेच्या तीरावर देखील आरती केली जाणार आहे. सभेच्या वातावरण निर्मितीसाठी रिक्षा आणि अन्य वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून सभेची माहिती शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोचवली जात आहे.

पंढरपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पंढरपूर येथे सोमवारी (ता. 24) होणारी सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करण्यात आली असून संपूर्ण शहरात 175 हून अधिक ठिकाणी स्वागत कमानी तर जागोजागी भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. या सभेसाठी सुमारे पाच लाखांहून अधिक शिवसेना कार्यकर्ते ,पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यावे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. शहरातील सर्व लॉजेस आणि धर्मशाळा हाऊसफुल्ल झाले आहेत.

ठाकरे यांनी राम मंदिर प्रश्नावर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी पंढरपुरात जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. अयोध्या नंतर प्रथमच महाराष्ट्रात ठाकरे सभा घेणार असल्याने ही ऐतिहासिक व्हावी यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
शरयू तीरावर जशी ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली तशीच चंद्रभागेच्या तीरावर देखील आरती केली जाणार आहे. सभेच्या वातावरण निर्मितीसाठी रिक्षा आणि अन्य वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून सभेची माहिती शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोचवली जात आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत ,लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, अनिल सावंत, महिला आघाडीच्या शैला गोडसे, तालुकाप्रमुख महावीर देशमुख रविमुळे,  माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, माजी शहरप्रमुख संजय घोडके आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी काही दिवसांपासून सभेच्या नियोजनात व्यस्त आहेत.

खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी या सभेच्या नियोजनासाठी पंढरपुरात येऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. यापैकी अनेक जण पंढरपुरात मुक्कामास दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. 

या सभेस पुरुष कार्यकर्त्यांच्या बरोबरच महिला देखील मोठ्या संख्येने याव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा प्रमुख , जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी दिली.

Web Title: Preparations for Uddhav Thackeray in Pandharpur