बेळगावात अनेकांच्या मोबाईलवर "बाल भक्तालागे तुझी आसरा'चीच धून

सतीश जाधव
Monday, 24 August 2020

बेळगावातील युवकांचे गाणे सुपरहिट
 

बेळगाव :  गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यामुळे सध्या बेळगावसह परिसरात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व घरात श्रीगणेशाची गाणी वाजत आहेत. मात्र, सध्या अनेकांच्या मोबाईलवर "बाल भक्तालागे तुझी आसरा' हे गाणे आवर्जून वाजविले जात आहे. बेळगावच्या महाविद्यालयीन युवकांनी एकत्रित येऊन हे गाणे तयार केले असून अवघ्या चार दिवसात या गाण्याला 4 लाख 24 हजार व्ह्यूज तर 19 हजार लाईक मिळाले आहेत. अल्पावधीतच हे गाणे बेळगावकरांच्या आवडीचे बनले आहे.

डीजे कार्तिक केडी या युट्यूब चॅनलजवर हे गाणे अपलोड करण्यात आले आहे. निमिर्ती कार्तिक केडी यांनी केली आहे. जोत्स्ना क्षीरसागर हिने गायन केले असून व्हिडीओ रेकॉर्डिंग अनिश मलखन्नवर यांनी केले आहे. आठवड्यापूर्वी गाण्याचे शुटींग केले असून गणेशोत्सवाच्या दोन दिवस अगोदर ते युट्यूबर अपलोड करण्यात आले आहे.

हेही वाचा- या ठिकाणी आहेत घरोघरी सावळ्या रंगाच्या गणेशमूर्ती -

गणेशोत्सवावर आधारित; चार दिवस सव्वाचार लाख व्ह्यूज​

जोत्स्ना ही गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड येथील रहिवासी असून तिला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे. सध्या जीएसएस कॉलजेमध्ये ती शिक्षण घेत आहे. लहानपणापासून येथील निर्मला प्रकाश व अर्चना बेळगुंदी यांच्याकडे गाण्याचे धडे घेतले आहे. दरम्यान, या गाण्याचे चित्रीकरण शिवबसवनगर येथील जोतिबा मंदिर व भवानीनगर गणपती मंदिरात केले आहे. जोत्स्नाला आई, वडील व प्रमोद कुलकर्णी यांचेही मार्गदर्शन लाभते. यापूर्वी जोत्स्नाने आपल्या युट्यूब चॅनेलवर चार गाणी अपलोड केली असून चारही गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा- निपाणीत भाषेमुळे होतीये शेतकऱ्यांची कोंडी ; हे आहे कारण ? -

"गणेशोत्सवानिमित्त वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी चार गाणी गायिली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढेही गाणी गात राहणार आहे.''
-जोत्स्ना क्षीरसागर, गायिका

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: present Sri Ganesh songs are being played in everyone mobile and home in the area including Belgaum