कोल्हापूर : महापौर माधवी गवंडींवर राजीनाम्यासाठी दबाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - महापौर माधवी गवंडी यांच्यावर राजीनाम्यासाठी पक्षातून दबाव वाढत आहे. गवंडी यांना दोन महिन्यांसाठी पद देण्यात आले आहे. ही मुदत २ सप्टेंबरला संपणार आहे. त्यांनी त्यादिवशीच राजीनामा द्यावा, असा निरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी गवंडी यांना धाडला आहे. 

कोल्हापूर - महापौर माधवी गवंडी यांच्यावर राजीनाम्यासाठी पक्षातून दबाव वाढत आहे. गवंडी यांना दोन महिन्यांसाठी पद देण्यात आले आहे. ही मुदत २ सप्टेंबरला संपणार आहे. त्यांनी त्यादिवशीच राजीनामा द्यावा, असा निरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी गवंडी यांना धाडला आहे. 

पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांना भेटून श्री. मुश्रीफ यांना दूरध्वनी करण्यास सांगितले आहे. दरम्यान, मुदत संपलेल्या महापौरपदाच्या निवडी राज्य सरकारने तीन महिने पुढे ढकलल्या आहेत. या नियमाचा फटका कोल्हापूर महापालिकेला बसतो की नाही, याबाबत साशंकता आहे. आतापर्यंत तरी महापालिकेला त्यासंदर्भातला कोणताही आदेश मिळालेला नाही. त्यामुळे आमदार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गवंडी यांनी राजीनामा द्यावा, यासाठी तगादा लावला आहे.

महापालिकेत दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना आघाडीची सत्ता आहे. दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे महापौरपदाचा कालावधी वाटून घेतला आहे. महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर सरिता मोरे यांना पाच महिने संधी मिळाली. त्यानंतर माधवी गवंडी यांना दोन महिन्यांची संधी देण्यात आली आहे. दोन्हीवेळी ॲड. सूरमंजिरी लाटकर यांना डावलले होते. २ जुलैला तर ऐनवेळी लाटकर यांचे नाव मागे पडत माधवी गवंडी यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी दोन महिन्यांसाठी पद असल्याचे गवंडी यांनी सांगितले होते.

राजीनामा घेण्याची जबाबदारी पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पोवार यांनी आज महापालिकेत येऊन महापौर माधवी गवंडी यांचे पती प्रकाश गवंडी यांना आमदार मुश्रीफांनी हा निरोप दिला आहे. आमदार मुश्रीफ यांना दूरध्वनी करा, असेही सांगितले.

निवडणुकीचे काय होणार?
पूरपरिस्थितीमुळे महापौर आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर घ्याव्यात, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. हा आदेश कोल्हापूर महापालिकेला लागू होतो की नाही, याबाबत साशंकता आहे. तूर्त तरी अशा कोणत्याही सूचना महापालिकेला प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे पक्षाकडून गवंडी यांच्यावर राजीनामा देण्याबाबत तगादा लावण्यात आला आहे.

आचारसंहितेपूर्वी महापौर निवडणुकीसाठी प्रयत्न
ऑक्‍टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील, अशी चिन्हे आहेत. त्याची आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्‍यता आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी महापौर निवड व्हावी, असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यादृष्टीने २ सप्टेंबरलाच गवंडी यांनी राजीनामा द्यावा, असा निरोप धाडण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pressure for Resignation of Mayor Madhavi Gavandi