पंढरपूर: भाविकाला मारहाण केल्याने पुजारी निलंबित

अभय जोशी
शनिवार, 20 मे 2017

मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुजारी म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची असली तरी या घटनेनंतर कर्मचारी श्री.भणगे यांनी सुरक्षा रक्षक अथवा मंदिर समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुसे यांच्या विरोधात तक्रार न करता थेट त्यांना मारहाण केली.

पंढरपूर - येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीस घालण्यासाठी मूर्तीच्या दिशेने फुलांचा हार टाकल्यामुळे चिडलेल्या मंदिर समितीच्या कर्मचारी असलेल्या पुजाऱ्याने एका भाविकास मारहाण केली होती. या प्रकरणातील पुजारी म्हणून नियुक्तीस असलेल्या अशोक भणगे यास अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. 

श्री विठ्ठल रुक्‍मिणींच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे यासाठी देवाच्या मूर्तीवर हळद,कुंकू, बुक्का, फुले व हार टाकू नयेत अशी मंदिर समितीची अपेक्षा आहे. त्या संदर्भात स्पिकर वरुन सूचना सांगितल्या जात असतात परंतु बहुतांष भाविक सोबत आणलेला हार देवाला मूर्तीला घालण्यासाठी मूर्तीच्या दिशेने टाकतात. त्यावेळी मूर्तीच्या शेजारी पुजारी म्हणून नियुक्त केलेले मंदिर समितीचे कर्मचारी मूर्तीवर हार पडू नये व देवाच्या मूर्तीला तसेच मूर्तीवरील दागिन्यांना इजा होऊ नये यासाठी हार मूर्तीच्या दिशेने जाऊ न देता मध्ये अडवतात. 

येथील श्री विठ्ठल मंदिरात बुधवार (ता.17) रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास दत्तात्रय सुसे (रा.शेवगाव ता.अहमदनगर) हे त्यांच्या कुटुंबियांसह दर्शनासाठी आले होते. श्री.सुसे यांनी सोबत आणलेला फुलांचा हार श्री विठ्ठलाच्या गळ्यात घालण्यासाठी मूर्तीच्या दिशेने फेकला. तो हार मूर्तीवरील मुकुटाच्या मागे जाऊन अडकला. त्यावेळी श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या शेजारी पुजारी म्हणून उभा असलेले मंदिर समितीचे कर्मचारी अशोक नारायण भणगे यानी चिडून भाविक श्री.सुसे यांना मारहाण केली होती. 

या घटनेनंतर श्री,सुसे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात मंदिर समितीचा कर्मचारी असलेला पुजारी अशोक भणगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. 

मूर्तीचे संरक्षण करण्याची जबाबदारी पुजारी म्हणून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची असली तरी या घटनेनंतर कर्मचारी श्री.भणगे यांनी सुरक्षा रक्षक अथवा मंदिर समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुसे यांच्या विरोधात तक्रार न करता थेट त्यांना मारहाण केली. त्यामुळे भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे सीसीटीव्ही फूटेज तपासून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल असे मंदिर समितीकडून त्या दिवशी सांगितले गेले होते. 

दरम्यान प्राथमिक चौकशी व सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर कर्मचारी भणगे यास निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी आज "सकाळ" शी बोलताना सांगितले. 

Web Title: priest suspend on devotee thrashed out in vithal temple pandharpur