कोरेगावचा आरोग्य विभाग ‘सलाइन’वर

राजेंद्र वाघ
सोमवार, 3 डिसेंबर 2018

कोरेगाव - तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने तालुक्‍याच्या आरोग्याची काळजी वाहणारा आरोग्य विभाग सध्या ‘सलाईन’वर आहे. याशिवाय शिक्षण, कृषी विभागांसह पंचायत समिती कार्यालयातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने एकूणच या सर्व पार्श्‍वभूमीवर सामान्य नागरिकांची मात्र चांगलीच अडचण होत आहे.  

कोरेगाव - तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त असल्याने तालुक्‍याच्या आरोग्याची काळजी वाहणारा आरोग्य विभाग सध्या ‘सलाईन’वर आहे. याशिवाय शिक्षण, कृषी विभागांसह पंचायत समिती कार्यालयातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने एकूणच या सर्व पार्श्‍वभूमीवर सामान्य नागरिकांची मात्र चांगलीच अडचण होत आहे.  

तालुक्‍यात सात प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यान्वित असून, या सर्व ठिकाणी प्रत्येकी दोन वैद्यकीय अधिकारी आवश्‍यक आहेत. मात्र, त्यापैकी किन्हई व तडवळे संमत कोरेगाव येथे सध्या एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही. उर्वरित सातारारोड, पळशी, वाठार स्टेशन, रहिमतपूर, वाठार किरोली येथे प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. त्याचबरोबर आरोग्य सेविका व आरोग्य सहायकांची प्रत्येकी पाच, शिपाई १२ अशी पदेही रिक्त आहेत.

प्रत्येक आरोग्य केंद्रातील दररोजची सरासरी ‘ओपीडी’(बाह्यरुग्ण) १०० ते १५० एवढी आहे. किन्हई व तडवळे येथील बाह्यरुग्णांच्या तपासणीसाठी दुसऱ्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पाठवल्यास त्यांच्या मूळच्या‘ओपीडी’वर परिणाम होत आहे. त्याबरोबर कोरेगाव नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ३० हजार शहरी लोकसंख्येसाठी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे या ठिकाणची जबाबदारी देखील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडेच आहे. अशा परिस्थितित उपकेंद्रांना भेटी देणे, शाळांच्या भेटी, अशा प्रकारचे ‘फील्ड व्हिजी’टचे काम वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होत नाही. परिणामी नेमून दिलेल्या आरोग्य सेवेच्या उद्दिष्टांवरही परिणाम होत आहे. आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या उपकेंद्रासाठी एक बीएएमएस वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्याचे धोरण आहे. त्यानुसार तालुक्‍यातील सहा उपकेंद्रांसाठी प्रत्येकी एका बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नियुक्तीची अपेक्षा आहे; परंतु कोरेगावसह जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांमध्ये अशी पदे अद्याप भरलेली नाहीत. 

शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची सहापैकी दोन पदे, केंद्र प्रमुखांची १७ पैकी पाच पदे रिक्त असून, पंचायत समिती कार्यालयामध्येही सहा पदे रिक्त आहेत. दुसऱ्या विभागाचे कामकाज सांभाळणाऱ्यांवर जबाबदारी सोपवून कामाचा निपटारा करण्याची कसरत प्रशासनाला करावी लागत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सामान्य नागरिकांची मात्र चांगलीच अडचण होत आहे.

विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याबाबतचे ठराव पंचायत समितीच्या मासिक सभांमध्ये केले आहेत. सभापती या नात्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही रिक्त पदांचा विषय वेळोवेळी मांडला आहे.
- राजाभाऊ जगदाळे, सभापती, कोरेगाव

Web Title: Primary Health Department Issue