शेतकऱ्यांचा सन्मान ‘युद्ध पातळीवर’

शेतकऱ्यांचा सन्मान ‘युद्ध पातळीवर’

सातारा -  केंद्र सरकारने अल्प व मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करून, त्याच्या तत्काळ अंमलबजावणीचे आदेश झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात महसूल, ग्रामविकास, कृषी प्रशासनाने युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यातील पाच एकरांपर्यंतच्या शेतकऱ्यांची माहिती भरण्याचे काम मार्गी लावले जाणार आहे. 

लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असल्याने भाजप सरकारने शेतकरी, मध्यमवर्गीयांना खूष करणारा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला. त्यात प्राधान्याने शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी किसान सन्मान निधी योजनाची घोषणा केली; पण ही घोषणा केवळ घोषणाच राहून त्याचा व्होट बॅंकेवर परिणाम होऊ नये, यासाठी तीन टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, तालुकास्तरावर प्रांताधिकारी, गावस्तरावर तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या झाल्या असून, त्यात महसूल, कृषी, उपनिबंधक, ग्रामविकास विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. 

जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारावकर यांनी अधिकाऱ्यांमार्फत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत कालच कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित केल्या. त्यांना दोन दिवसांत युद्ध पातळीवर पाच एकरांतील शेतकऱ्यांच्या यादी बनवून माहिती भरण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक,  कृषी सहायकांचे भंबेरी उडाली आहे. 

शासनाने सात ते १० फेब्रुवारीपर्यंत गावनिहाय खातेदार शेतकऱ्यांची यादी तयार करणे, १० ते १२ फेब्रुवारीपर्यंत कुटुंबनिहाय वर्गीकरण करून खात्री करणे, सात ते १५ फेब्रुवारीपर्यंत संगणकीकृत माहितीचे संकलन करणे, २० व २१ फेब्रुवारीला हरकतींवर दुरुस्ती करून अंतिम यादी बनवणे, २२ ते २६ फेब्रुवारीपर्यंत तालुकास्तरीय समितीमार्फत शासनास यादी देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मतांसाठी वाटेल ते?
शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू असून, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जाण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे विरोधी राजकीय वर्तुळात भाजप सरकार मतांसाठी वाटेल ते करत असल्याचा आरोप होत आहे.

...यांना लाभ नाही
  पाच एकरांवरील शेतकरी
  सरकारी नोकरदार
  सरकारी पेन्शनदार
  आयकर भरणारे

शेतकऱ्यांनो, ही माहिती द्या
  बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी कोड
  आधार क्रमांक, इतर ओळखपत्र
  मोबाइल क्रमांक/ एनरॉलमेंट आयडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com