पृथ्वीराज चव्हाण समर्थकांची माघार धक्कादायक

पृथ्वीराज चव्हाण समर्थकांची माघार धक्कादायक

कऱ्हाड - माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव यांच्या बिनविरोध निवडीने जनशक्ती आघाडीने निवडणुकीतील विजयाचे खाते उघडले. जनशक्ती आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच समर्थकांना आघाडीकडून दाखल केलेली उमेदवारी माघार घ्यावी लागल्याने, तसेच भाजपच्या जिल्हाध्यक्षांची माघार या घडामोडी पालिका निवडणुकीच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या ठरणार आहेत.

पालिका निवडणुकीसाठी 29 पैकी एक जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित 28 जागांसाठी 121 उमेदवार, तर नगराध्यक्षपदासाठी 12 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. पालिका निवडणुकीत दोन ठिकाणी दुरंगी, तर 11 ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. नगराध्यक्षपदासह उर्वरित ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. या निवडणुकीत सत्तारूढ लोकशाही आघाडीने एकला चलो रे... चा नारा देत 29 पैकी 23 जागा व नगराध्यक्षपदावर उमेदवार दिलेला आहे. जनशक्ती आघाडी 29 पैकी एका ठिकाणी अर्ज अवैध ठरल्यामुळे नगराध्यक्षपदासह 28 जागांवर निवडणूक लढवत आहे. दरम्यान, त्यातील प्रभाग सातमधून माजी नगराध्यक्षा शारदा जाधव बिनविरोध निवडून आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती आघाडीत यशवंत आघाडीचे राजेंद्र यादव, जनशक्तीचा जाधव गट, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील एकत्र आहेत.

त्यातील जागा वाटपाचा फॉम्युला जाहीर केला नसला, तरी आमदार चव्हाण यांचे समर्थक असलेल्या माजी नगरसेवक अशोकराव पाटील, विद्यमान नगरसेवक श्रीकांत मुळे यांच्या पत्नी दीपाली मुळे व सुनील शिंदे यांना काल अर्ज मागे घ्यावे लागले. त्यामुळे अनेकांना धक्का बसला. आमदार चव्हाण यांच्या निष्ठावंतांना आघाडीने उमेदवारीबाबत अन्याय केल्याची शहरात चर्चा आहे. आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या आमदार चव्हाण यांना कोणत्या कारणासाठी निष्ठांवतांच्या उमेदवारीचा बळी दिल्याची चर्चा कालपासून शहरात सुरू आहे. माघारीनंतर आमदार चव्हाण यांच्या तीन ते चार समर्थकांचीच उमेदवारी राहिली आहे. श्रीमती जाधव बिनविरोध आल्याने जाधव गटही निश्‍चिंत आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणात "जनशक्‍ती'तर्फे श्री. यादव व माजी नगराध्यक्ष श्री. पाटील यांच्यासह त्यांच्या उमेदवारांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रभाग सहामधून काल अचानक माघार घेतल्याने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या उमदेवारीनंतर प्रभाग सहा बिनविरोध होण्याची चिन्हे होती. मात्र, तेथील अपक्षाची उमेदवारी राहिल्याने पूर्ण प्रभाग बिनविरोध झाला नाही. मात्र, या राजकीय घडामोडी पालिकेच्या निवडणुकीवर परिणाम करणाऱ्या ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

मतांच्या बेरीजेसाठी नमते ?
जनशक्ती आघाडीच्या उमेदवारीचा घोळ उमेदवारी अर्ज भरण्यापासून सुरू होता. जागा वाटपाबाबतच्या फॉम्युल्यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून होते. यशवंत आघाडीचे राजेंद्र यादव यांनी त्यांच्या समर्थकांच्या उमेदवारी निश्‍चितीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, आमदार चव्हाण त्याला कितपत प्रतिसाद देणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अर्ज माघारीनंतर श्री. चव्हाण समर्थकांनी अर्ज मागे घेतल्याने श्री. यादव यांच्या समर्थकांना उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. याबाबत शहरात चर्चा आहे. मात्र, आमदार चव्हाण यांनी विधान परिषदेच्या सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे कॉंग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या मतांची बेरीज करण्याच्या दृष्टीने पालिका उमेदवारीत नमते घेत तडजोड केल्याची शहरात चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com