मलकापुरात बाबा-काका एकत्रिकरणाच्या हालचाली

Prithviraj-and-Vilasrao
Prithviraj-and-Vilasrao

कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणच्या राजकारणात प्रभावी ठरणाऱ्या माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या गटाला सोबत घेऊन मलकापूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय होतो आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्येही काका गटाच्या समर्थकांना स्थान देण्यात आले. पालिकेच्या ज्या प्रभागात उंडाळकर गटाचा प्रभाव आहे, त्या प्रभागातील जागा काका गटाला देण्याच्या फॉर्म्युल्यावर उंडाळकर व चव्हाण गटाचे एकमत झाले आहे. त्यामुळे उंडाळकर गटाच्या प्रभावशील प्रभागात चव्हाण गट शिथिल होऊन त्यांच्या उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे आगामी मलकापूर पालिकेत दोन्ही गट एकत्रित दिसतील. त्यामुळे त्यांच्या एकत्रित ताकदीशी अतुल भोसले यांच्या गटाला सामना करावा लागणार आहे. 

आमदार पृथ्वीराज चव्हाण व ज्येष्ठ नेते विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या गटातील सौख्य कऱ्हाडसह जिल्ह्यास परिचित आहे. जेथे चव्हाण तेथे उंडाळकर विरोधात आणि जेथे उंडाळकर तेथे चव्हाण गट विरोधात असल्याची स्थिती कऱ्हाडसह जिल्ह्याने अनुभवली आहे. विधानसभा निवडणुकीतही दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात होते. त्यानंतर कृष्णा कारखान्यासह अन्य निवडणुकीतही तीच स्थिती दिसली. मात्र, अलीकडच्या काही काळात दोन्ही गट एकत्रित येण्याच्या मानसिकतेत आहेत. त्या दृष्टीने हालचाली झाल्या. जिल्ह्यासह कऱ्हाड दक्षिणेतही भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन त्या दृष्टीने सकारात्मक चर्चाही सुरू आहे. स्थानिक पातळीवर उंडाळकर व चव्हाण गट अनेकदा एकत्रित दिसले. काका गट व चव्हाण गटाच्या मनोमिलनाची मानसिकता झाली आहे. अनेक कार्यक्रमांत काका गटाचे नेते उदयसिंह पाटील व थेट श्री. चव्हाण एकत्रित दिसले. मलकापूर पालिकेच्या निमित्ताने दोन्ही गट एकत्रित दिसतील, अशा राजकीय हालचाली सुरू आहेत. 

मलकापूर पालिकेत दोन्ही गट एकत्रित आहेत. मध्यंतरी पालिकेच्या निमित्ताने काँग्रेसने मुलाखती घेतल्या. श्री. चव्हाण यांनी घेतलेल्या मुलाखतीत काही काका गटाचे समर्थकही होते. जेथे काका गट ‘स्ट्राँग’ आहे, तेथे चव्हाण त्यांना ‘बायपास’ देण्याची शक्‍यता आहे. 

एकाच छताखाली ते निवडणूक लढवतीलही. त्याच मुद्द्यावर जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित होईल. त्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे. ज्या प्रभागात उंडाळकर मजबूत आहे. तेथे उंडाळकर गटाचा उमेदवार दिला जाणार आहे. तेथे चव्हाण गट व विद्यमान सत्ताधारी मनोहर शिंदे यांचा गट शिथिल भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहे. त्यासाठीही बाधणी सुरू आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा विषय चर्चेत नाही. त्यावर चव्हाण गटाचाच हक्क असणार आहे.

मात्र, अन्य ठिकाणी चव्हाण गटाची भूमिका काका गटाला सहकार्याची राहील. त्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही थेट चर्चा झाली आहे. श्री. चव्हाण यांनीही समविचारी लोकांना सोबत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ती चर्चा पुढे भूमिकेत बदलणार आहे. भाजपला रोखण्यासाठी होणारी व्यूहरचनेवर भाजपची नेमकी काय खेळी राहणार याकडेही लक्ष आहे.

बंडखोरी होणार का? 
उंडाळकर व चव्हाण गट एकत्रित येणार आहे. उंडाळकर गटांचा प्रभाव असलेल्या प्रभागात जर त्या गटाची भूमिका नरमाईची राहिल्यास त्या प्रभागात बंडखोरी होण्याची शक्‍यता आहे. ती रोखण्यासाठी विद्यामान सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ते उमेदवार भाजपच्या गळाला लागता कामा नयेत, यासाठीही वेगळी खेळी करावी लागणार आहे. त्यामुळे येणारा काळ सत्ताधाऱ्यांच्या परीक्षेचा असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com