पृथ्वीराज पवार यांना तीन महिन्यांची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

'सर्वोदय'चे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना तीन महिने कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. इस्लामपूर न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली.

सांगली - कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून सुरु असलेल्या संघर्षात राजारामबापू कारखान्याची मानहानी केल्या प्रकरणी "सर्वोदय'चे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांना तीन महिने कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. 
इस्लामपूर न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली. त्यांना अपीलासाठी 15 दिवसांची मुदत असून तत्काळ जामीन मंजूर करण्यात आला. पृथ्वीराज माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव असून शिवसेनेच्या युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहे. कारखाना हक्कप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष पेटला आहे. 

सर्वोदय कारखाना काही करारान्वये राजारामबापू साखर कारखान्याला दहा वर्षांपूर्वी चालवण्यास दिला होता. तो सध्या राजारामबापू कारखान्याकडेच असून त्याचे युनिट क्रमांक 3 म्हणून चालवला जातोय. त्यांनी करार संपला तरी कारखाना परत दिला नाही, तो हडपण्याचा घाट घातला आहे, असा आरोप करत पृथ्वीराज पवार यांनी आरोप केले होते. सन 2012 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी राजारामबापू कारखाना आणि जयंत पाटील यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले होते. त्यात कारखान्याची मानहानी झाल्याचा दावा दाखल करत इस्लामपूर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी सुरु होती. आज त्याचा निकाल झाला. त्यात पवार यांना तीन महिने कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Web Title: Prithviraj Pawar gets three months punishment