नूतनीकरणाला कोट्यवधी;खेळण्यांची मात्र दुरवस्था 

सचिन देशमुख
शनिवार, 8 एप्रिल 2017

प्रीतिसंगम बागेतील नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीपूर्वी बालोद्यानात खेळणी नव्याने बसवायची असोत अथवा दुरुस्ती करावयाची असोत, ती तातडीने केली जातील. मुलांना खेळण्यांचा पुरेपूर आनंद घेता यावा यादृष्टीने प्रयत्न केला जाईल.  
- रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड 

कऱ्हाड - शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या प्रीतिसंगम बागेवर आलेला ताण कमी करण्यासाठी पालिकेने शनिवार पेठेत आदरणीय पी. डी. पाटील उद्यानासह शिवाजी हाउसिंग सोसायटीत शिवाजी उद्यान व यशवंतराव स्मृतिसदनाभोवतीचे उद्यान विकसित केले. प्रीतिसंगम बागेत जन्मशताब्दीअंतर्गत नूतनीकरण करूनही बागेतील खेळण्यांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीपूर्वी नव्याने खेळणी बसणार, की दुरुस्तीची कामे मार्गी लागणार,याकडे लक्ष आहे.   

ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष (कै.) पी. डी. पाटील यांच्या दूरदृष्टीतून शहराच्या विकास आराखड्यात बागेसाठी अनेक जागा आरक्षित झाल्या. येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या संगमावर प्रीतिसंगम बाग विकसित करण्यात आली. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या बागेचे आकर्षण आजही कायम आहे. सायंकाळनंतर ही बाग गर्दीने फुलून जाते. एप्रिल, मे तसेच दिवाळीच्या सुटीत बागेत तुडुंब गर्दी दिसते. ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी पाथ वे तसेच बसण्यासाठी कट्टे, लॉनची सोय आहे. लहान मुलांसाठी खेळणीही आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून सुमारे तीन कोटी खर्चून बागेचे नूतनीकरण करण्यात आले. नुकतेच हे काम पूर्णत्वासही गेले आहे. त्यामुळे बागेचा लुक बदलला आहे. मात्र, बागेतील लहान मुलांच्या खेळण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. अनेक खेळणी मोडकळीस आली आहेत.

पालिकेने शनिवार पेठेत आदरणीय पी. डी. पाटील उद्यान विकसित केले. त्यामुळे कोल्हापूर नाका, मार्केट यार्ड, कार्वे नाका आदी परिसरातील नागरिकांची सोय झाली. त्यामुळे तेथेही मोठी गर्दी असते. शिवाजी हाउसिंग सोसायटीमध्येही पालिकेने बगीचा विकसित केला आहे. या उद्यानातही परिसरातील आबालवृद्धांना मोठा उपयोग होतो. सकाळी व्यायामासाठी येणारांची, तर सायंकाळी आबालवृद्धांची गर्दी दिसून येते. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनाच्या मागील बाजूसही उद्यान विकसित करण्यात आले आहे. या उद्यानामुळे बाहेरगावच्या नागरिकांची सोय होत आहे. दवाखान्यासह विविध कामानिमित्त आलेल्या नागरिकांना विश्रांतीसाठी या उद्यानाचा वापर होतो. बाहेरगावच्या मुलांना खेळण्याचा आनंद लुटता येतो. 

Web Title: pritisangam baug