परवानगीविना खासगी क्‍लास सुरू? लॉकडाउनचे नियम धाब्यावर; कुठे वाचा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

लॉकडाउनचे आदेश धाब्यावर बसवत ग्रामीण आणि निमशहरी भागात खासगी क्‍लासचालकांनी आपले वर्ग सुरू केले आहेत.

इस्लामपूर (जि . सांगली) : लॉकडाउनचे आदेश धाब्यावर बसवत ग्रामीण आणि निमशहरी भागात खासगी क्‍लासचालकांनी आपले वर्ग सुरू केले आहेत. क्‍लासचालकांशी संबंधित संस्था शासनाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत असताना, खासगींनी मात्र भरमसाट फी घेऊन क्‍लास सुरू केले आहेत. मुलांच्या जिवाशी सुरू असलेला हा घातक खेळ विचारात घेऊन स्थानिक प्रशासनाने याबाबत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. शासनाकडून अद्याप शाळा सुरू करण्यासंदर्भात कसलेही आदेश नाहीत. योग्य नियमांची अंमलबजावणी करून शाळा आणि क्‍लासेस सुरू करू, असे सांगूनही शासन कोणत्याही परिस्थितीत धोका पत्करायला तयार नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र क्‍लासेस सुरू झालेले आहेत. गेले चार महिने घरात मुलांच्या त्रासाला वैतागलेल्या पालकांनीही कुठून तरी मुले अभ्यासात गुंतून राहातील असा विचार करून मुलांना क्‍लासेसना पाठवायला सुरवात केली आहे. 

क्‍लासचालकांच्या संघटनेने परिस्थितीत झालेले बदल तसेच लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर प्रशासनाला भेटून क्‍लास सुरू करण्याबाबत विनंती केली होती. मात्र प्रशासनाने त्यांना अद्याप काही काळ धीर धरा अशा सूचना केल्या. अधिकृत परवानगी मागणारे लोक मागे आणि कोणतीही नोंदणी नसताना बेकायदेशीरपणे क्‍लास चालवणारे मात्र बिनधास्त अशी सध्याची परिस्थिती आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई होण्याची गरज अधिकृत नोंदणी असल्या क्‍लास चालकांच्यातून होत आहे. 

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे बेकायदेशीर क्‍लास सुरू आहेत. त्या त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून कारवाईची विनंती केली आहे. त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. 
- रवी बावडेकर, संचालक, हर्ष अकॅडमी, उपाध्यक्ष, जिल्हा क्‍लासचालक संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private class started without permission?