खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शिवाजी विद्यापीठाशी घेतली फारकत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मिरज - सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शिवाजी विद्यापीठाशी संलग्नता संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (बाटू)सोबत संलग्न होण्यासाठी बहुतांश महाविद्यालयांनी सहमती दर्शवली आहे.

मिरज - सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी शिवाजी विद्यापीठाशी संलग्नता संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्‍नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (बाटू)सोबत संलग्न होण्यासाठी बहुतांश महाविद्यालयांनी सहमती दर्शवली आहे.

महाविद्यालयांच्या प्रशासकीय प्रमुखांची बैठक आज संजय भोकरे शैक्षणिक संकुलात झाली. संस्थाचालक, संचालक, त्यांचे प्रतिनिधी, रजिस्ट्रार उपस्थित होते. पन्हाळ्याच्या हॉलिवूड अकादमीचे संचालक बी. आर. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सध्या या महाविद्यालयांचे सर्व शैक्षणिक कामकाज शिवाजी विद्यापीठाच्या कार्यपद्धतीनुसार चालते. विद्यापीठाने मान्यता दिलेला अभ्यासक्रम, त्यानुसार परीक्षा प्रक्रिया राबवली जाते. बैठकीतील चर्चेनुसार, ही संलग्नता संपुष्टात आणण्याचे ठरले. डॉ. आंबेडकर विद्यापीठाशी संलग्न होऊन स्वायत्तता मिळवण्याचा निर्णय झाला.

या विद्यापीठाची महाराष्ट्रभर प्रादेशिक केंद्रे असतील. प्रत्येक केंद्र स्वायत्त असेल. त्यांच्या कामकाजासाठी स्वतंत्र संचालक राहील. पश्‍चिम महाराष्ट्रासाठीचे केंद्र पुण्यात असेल. त्याअंतर्गत सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांचे कामकाज चालेल. त्यासाठी कोल्हापुरात उपकेंद्र कार्यरत राहील. या उपकेंद्रासाठी एक संयुक्त संचालक, उपसंचालक असतील. प्रत्येक प्रादेशिक व उपप्रादेशिक केंद्रात संशोधनासाठी स्वतंत्र केंद्र कार्यरत असेल. या केंद्रांवरील सर्व नियुक्‍त्या महाराष्ट्र शासनामार्फत केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना खासगी (स्वायत्त) संस्थांतील अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेता येईल. कर्नाटकसह इतर राज्यांतील विद्यापीठांप्रमाणे हे स्वतंत्र तंत्रशिक्षण विद्यापीठ असेल. अधिकाधिक स्पर्धात्मक अभ्यासक्रम व शिक्षण, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, गुणवत्तावाढ इत्यादी उद्दिष्टांनुसार कामकाज चालेल.

डॉ. आंबेडकर विद्यापीठाशी संलग्नता घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांनी 21 नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करायचा आहे. खासगी महाविद्यालय संघटनेचे सचिव डॉ. ए. के. गुप्ता यांनी बैठकीत ही माहिती दिली. बहुतांश महाविद्यालयांनी नव्या संलग्नतेला सहमती दर्शवली.

बैठकीला भोकरे संकुलाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी संपतराव जाधव, सुधीर जोशी, संचालक ए. सी. भगली आदी उपस्थित होते. प्रा. धनंजय दिवेकर यांनी आभार मानले.

राज्यातील सर्व अभियांत्रिकी कधी ना कधी "बाटू'ला संलग्न करावीच लागणार आहेत. आता ज्यांना बाटूला संलग्न व्हायचे आहे ते होऊ शकतात. काही कालावधीनंतर सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालये बाटूला संलग्न होतील. कारण शासनानेच तसा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक उपक्रमावर फार होणार नाही.
- दत्तात्रय मोरे, बी. सी. यू. डी. संचालक, शिवाजी विद्यापीठ

Web Title: Private engineering colleges in the separation of Shivaji University