"रॅपिड ऍन्टीजेन' चाचण्यासाठी 29 ठिकाणी खासगी लॅब व दवाखाने 

घनश्‍याम नवाथे 
Friday, 11 September 2020

कोरोना संसर्ग झाल्याचे लवकर निदान व्हावे यासाठी रॅपिड ऍन्टीजेन चाचणी केली जात आहे.

सांगली : कोरोना संसर्ग झाल्याचे लवकर निदान व्हावे यासाठी रॅपिड ऍन्टीजेन चाचणी केली जात आहे. महापालिका क्षेत्रात शासनाच्यावतीने केल्या जाणाऱ्या ऍन्टीजेन चाचण्यासाठी गर्दी होत असल्यामुळे नुकतेच 29 ठिकाणी खासगी लॅब व दवाखान्यात याची चाचणी करण्यास परवानगी दिली. सध्या या ठिकाणी चाचण्यांसाठी गर्दी होऊ लागली आहे. 

कोरोना संसर्ग झाला आहे की नाही याचे निदान करण्यासाठी सध्या रॅपिड ऍन्टीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. तपासणीसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. ज्या रूग्णांना त्वरीत उपचाराची गरज आहे, त्यांच्यासाठी ऍन्टीजेन चाचणी केली जाते. यामध्ये रूग्णाच्या नाक व घसा येऊन स्वॅब घेतला जातो. या चाचणीचा अहवाल अवघ्या अर्धा तासात समजू शकतो. चाचणी लवकर आणि कमी खर्चाची आहे. परंतू ऍन्टीजेन चाचणीच्या अहवालावरून गोंधळाचे वातावरण आहे. सुरवातीला काही ठिकाणी चाचणीला विरोध झाला होता. त्यामुळे प्रबोधन करून चाचण्या कराव्या लागल्या. 

सध्या जिल्ह्यात समुह संसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल येण्यास वेळ लागतो. अशावेळी जास्तीत जास्त लोकांच्या तपासणी करून पॉझिटीव्ह रूग्णांचे विलगीकरण करण्यासाठी आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी ऍन्टीजेन चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. शासनातर्फे केली जाणारी ऍन्टीजेन चाचणी मोफत होते. तर खासगी लॅबमधील चाचणीसाठी शुल्क आकारले जाते. 

महापालिका क्षेत्रात ऍन्टीजेन चाचण्यासाठी गर्दी होऊ लागल्यामुळे खासगी लॅब व दवाखान्यात अधिक प्रमाणात ऍन्टीजेन चाचणी व्हावी यासाठी दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात 29 ठिकाणी या चाचण्या करण्यास परवानगी दिली. त्यानुसार खासगी लॅब व दवाखान्यात दोन दिवसापासून या चाचण्या केल्या जात आहेत. खासगी लॅबमध्ये सध्या 600 रूपये शुल्क आकारले जाते. परंतू तत्काळ अहवाल येत असल्यामुळे तसेच गर्दी कमी असल्यामुळे त्याला पसंती दिली जात आहे. मात्र काही नामांकित लॅब व दवाखान्यात या चाचण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच या चाचण्यांचे प्रमाणही काल (ता.9) पासून वाढले आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private labs and clinics for "rapid antigen testing"

Tags
टॉपिकस
Topic Tags: