शिवसेनेच्या उप जिल्हाप्रमुखावर खाजगी सावकारीचा गुन्हा

रुपेश कदम
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मलवडी : शिवसेनेचे साताऱ्याचे उप जिल्हाप्रमुख संजय भोसले (रा. बिजवडी, ता माण) यांच्यासह पाचवड (ता. माण) येथील विशाल विजय जगदाळे व हिंदूराव शंकर जगदाळे यांच्या विरोधात खाजगी सावकारीचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

मलवडी : शिवसेनेचे साताऱ्याचे उप जिल्हाप्रमुख संजय भोसले (रा. बिजवडी, ता माण) यांच्यासह पाचवड (ता. माण) येथील विशाल विजय जगदाळे व हिंदूराव शंकर जगदाळे यांच्या विरोधात खाजगी सावकारीचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जोतीराम तुकाराम पवार (रा. पाचवड, ता. माण) यांनी सन 2016 मध्ये प्रियदर्शनी पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठी खाजगी सावकारीचा धंदा करणाऱ्या हिंदुराव जगदाळे याच्याकडून महिना दहा टक्के व्याजाने पैसे घेतले होते. मुद्दल व व्याज मिळून पवार यांनी जगदाळे याला 2 लाख 60 हजार परत केले. परंतू अजून एक लाख दे म्हणून जगदाळे हा पवार यांना दमदाटी करत असून पवार यांनी दिलेला आयडीबीआय बँकेचा कोरा चेक परत देत नाही.
नोव्हेंबर 2017 मध्ये जोतीराम पवार यांनी हिंदुराव जगदाळे यांचे व्याजाने घेतलेले पैसे देण्यासाठी व शेतीकामासाठी दुसरा खाजगी सावकारीचा धंदा करणारा विशाल जगदाळे याच्याकडून 6 लाख 50 हजार रुपये महिना पाच टक्के व्याजदराने घेतले. प्रत्येक महिन्याला 32 हजार 500 रुपये असे एकूण पाच महिने पवार यांनी विशाल जगदाळे यास व्याज दिले. दरम्यानच्या कालावधीत विशाल हा पैशासाठी खुपच त्रास देवू लागल्याने पवार यांनी मार्च महिन्यात त्याला दोन लाख परत दिले. तर एक लाख ऐंशी हजार विशाल याच्या सांगण्यावरुन शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय भोसले यांच्या घरी जावून भोसले यांना दिले.

त्यानंतर विशाल याने वारंवार पैशाचा तगादा लावला. संजय भोसले यांनी तु विशालचे पैसे का देत नाहीस म्हणून पवार यांना स्वतःच्या घरी डांबून ठेवले व रात्री दोन वाजता बिजवडी स्टॅण्डवर नेवून तिथे हाताने व चप्पलने मारहाण केली. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर भोसले यांनी व्याजाने घेतलेले पैसे दे नाहीतर तुझी जमीन लिहून दे अशी दमदाटी पवार यांना केली. तर फोनवरुन वारंवार अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. व्याजाने घेतलेल्या पैशाच्या वसूलीच्या तगाद्याला कंटाळून जोतीराम पवार यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पवार यांच्या तक्रारीवरुन संजय भोसले, विशाल जगदाळे व हिंदुराव जगदाळे यांच्या विरोधात खाजगी सावकारी, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Private money lender complaint register against shivsene leader