कऱ्हाडला खासगी शाळांत डोनेशन तेजीत!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

पुस्तके, कपडेही आमचीच
खासगी शाळांनी जास्तीतजास्त मुले आपल्या शाळेकडे आकर्षित व्हावीत, यासाठी त्यांना ड्रेसकोड, वह्या, पुस्तके, कपडेही शाळेतूनच घेण्याचे बंधनकारक केले आहे. संबंधित शाळेने ठरवून दिलेल्या ठिकाणीच जाऊन त्या शाळेचे साहित्य खरेदी करायचे असाही दंडक पालकांना घालण्यात आला आहे. त्यामुळे पालकांना तोंड दाबून बुक्‍यांचा मार सहन करावा लागत आहे.

कऱ्हाड - गुढीपाडव्यापासून प्ले ग्रुपसह अन्य वर्गांच्या प्रवेशाची पालकांकडून तयारी सुरू आहे. मात्र, खासगी शाळांच्या फीचे आकडे ऐकून पालकांच्या कपाळाला आट्या पडत आहेत. प्ले ग्रुपसाठी दहा ते २० हजार आणि पहिले ते सातवीपर्यंत २० ते ४५ हजारांपर्यंत डोनेशन खासगी शाळांनी केले आहे. त्यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण राहिले नसल्याचे दिसत असून, खासगी शाळा चालकांनी मात्र सध्याच्या मंदीच्या काळातही डोनेशनची संधी शोधल्याचेच दिसत आहे. 

शासनाने एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी कायदा केला. त्याअंतर्गत बालकांच्या शिक्षणासाठी शासन स्तरावरून शिक्षण विभागामार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध उपक्रमही राबवले जात आहेत. मात्र, शिक्षण विभागाला खासगी शाळांच्या डोनेशनवर नियंत्रण ठेवता आले नसल्याचेच दिसत आहे. गुढीपाडव्यानंतर सध्या शाळांच्या प्रवेशाची धांदल सुरू झाली आहे. काही शाळांनी तर फेब्रुवारीपासून ॲडमिशनची कार्यवाही सुरू करून सध्या ती प्रक्रिया आटोपल्याचे सांगण्यात आले, तर काही शाळांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, प्रवेशासाठी कोणत्या शाळेने किती डोनेशन, फी आकारावी यासाठी काही नियमच राहिला नसल्याचे दिसत आहे. 

खासगी शाळांतून प्ले ग्रुपसह अन्य वर्गांच्या प्रवेशासाठी बालकांनी अर्ज आणून शाळा सांगेल तेवढे डोनेशन देण्याची तयारी असेल, तरच अर्ज भरून सादर करावा, असे सांगण्यात येत आहे. सध्या प्ले ग्रुपसाठी दहा ते २० हजारांपर्यंत आणि पहिले ते सातवीपर्यंत २० ते ४५ हजार रुपयांपर्यंत डोनेशन खासगी शाळांनी केले आहे. हे डोनेशनचे आकडे ऐकून सर्वसामान्यांना इच्छा असूनही त्यांच्या मुलांना संबंधित शाळांत शिक्षणासाठी घालता येत नसल्याचे चित्र आहे. एकीकडे ही प्रवेशाची आणि डोनेशनची धामधूम सुरू असताना शिक्षण विभागाचे मात्र त्याकडे दुर्लक्षच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे खासगी शाळा चालकांनी मात्र सध्याच्या मंदीच्या काळातही डोनेशनची संधी शोधल्याचेच दिसत आहे.

Web Title: Private School Donation Student Admission