एसटीची वाटचाल खासगीकरणाकडे...

शिवाजी यादव
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कोल्हापूर - एसटीची पार्सल सेवा, शिवशाही सेवेच्या १५०० आरामगाड्या, एसटी तिकीट बुकिंग सेवा, याशिवाय तिकीट मशिन खासगी कंपनीतून घेतली जातात. एसटी नोकरभरती परीक्षा नियोजनाचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे.

यापाठोपाठ बसस्थानक आणि एसटी गाड्यांच्या स्वच्छतेचे कंत्राट खासगी कंपनीला देण्याच्या हालचाली सुरू आहेत. एसटीच्या महसुलातील १२ ते १५ टक्के वाटा खासगीकडे जात आहे. त्यामुळे एसटीचे टप्प्याटप्प्याने खासगीकरण होत असून त्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी आहे, परिणामी येणाऱ्या काळात एसटी कर्मचारी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सेवा देणारे आशिया खंडातील सर्वांत मोठे महामंडळ म्हणून एसटीचा लौकिक होता. सुरवातीला ४४ आसनक्षमतेच्या साध्या बस, नंतर जलद, सुपरएक्‍स्प्रेस रातराणी, अशा सेवा झाल्या. १९८३ मध्ये एशियाड निमआराम बस सुरू झाली. 

२००० पर्यंत राज्यातील प्रत्येक गावात एसटीची सेवा पोचली. त्यानंतरच्या काळात मात्र खासगी आराम गाड्यांचे लोण सर्वत्र 
पसरले. त्यावर नियंत्रण मिळविणे सरकारला शक्‍य झाले नाही, एसटीचा बहुतांश प्रवासी वर्ग खासगी वाहतूकदारांनी पळविला. 
यात एसटीचा महसूल घटला, खर्च वाढला. वीस वर्षांत एसटीचा संचित तोटा दोन हजार कोटींच्या घरात गेला.

एसटी सेवा प्रभावीपणे चालविणे मुश्‍कील झाले. यात इंधनदरवाढीने तर एसटी अधिकच मेटाकुटीला आली. यातून खासगीकरणाच्या दिशेने एसटीची पावले पडताना पार्सलसेवेचे पहिले खासगीकरण झाले. पार्सल सेवेतून मिळणाऱ्या एकूण वाट्यातील २५ ते ३० टक्के रक्कम कंत्राटदाराला द्यावी लागते. या पाठोपाठ शिवशाही बससेवा सुरू झाली. यातही एका गाडीत कमीत कमी १६ पेक्षा जास्त प्रवासी असणे अपेक्षित आहे. 
तसेच दिवसाला ३५० किलोमीटरचे पैसे कंत्राटदाराला द्यावे लागतात. पुढील काळात स्वच्छतेचे कंत्राट खासगी कंपनीला दिल्यास त्यांचेही पैसेही एसटीला खासगी कंत्राटदाराला द्यावे लागणार आहेत. 

एसटीच्या प्रत्येक सेवेचे असे खासगीकरण झाले तर नोकरी धोक्‍यात येणार, याची सर्वांत जास्त भीती कर्मचाऱ्यांत आहे. आजवर ज्या कंपन्यांना खासगी कंत्राटे दिली, तिथे एसटी कमचाऱ्यांना स्थान नाही. या उलट एसटीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासी मिळवायचे आणि मिळालेला महसूल  खासगी शिवशाही कंत्राटदाराला द्यायचा, असा प्रकार होत आहे. 

एसटीच्या सेवा खासगीकरणाद्वारे दिल्यास एसटीच्या पूर्वापार विश्‍वासाला धक्का बसणार आहे. परिणामी प्रवासी सेवेवर परिणाम झाला, तर त्यात एसटी महामंडळाचे व कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी खासगीकरणाला एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध राहील.
- संदीप शिंदे,
राज्याध्यक्ष, एसटी कर्मचारी मान्यताप्राप्त संघटना. 

Web Title: privatization of ST